६५ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ गुरुवारी दिल्लीच्या विज्ञान भवन येथे संपन्न झाला. या पुरस्कार समारंभातील काही पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिले गेले. त्यानंतरचे पुरस्कार हे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले गेले. याबाबत समारंभाच्या काही तास आधी पुरस्कार विजेत्यांना कळवण्यात आले होते. त्यामुळे अनेक पुरस्कार विजेत्यांनी या समारंभावर बहिष्कार घातला.

समारंभाच्या काही तास आधी काही पुरस्कार विजेत्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून त्यांची नाराजी कळविली. पण राष्ट्रपतींकडून त्यास उत्तर न आल्याने अनेकांनी पुरस्कार समारंभाला न येणेच पसंत केले. आम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसेल तर आम्ही पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी भूमिकाही काहींनी मांडली. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार न मिळणे हे अपमानास्पद असल्याच्या भावना अनेक पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केल्या.

या पुरस्कार समारंभात २ राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरलेले ज्येष्ठ मल्याळम निर्माते जयराज यांनी बहिष्कार टाकणाऱ्या पुरस्कार विजेत्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. जे विजेते समारंभात पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले नाहीत, त्यांनी या पुरस्कारात असलेली बक्षिसाची रक्कमदेखील परत करावी, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रीय पुरस्कारांबरोबर ठराविक रक्कम बक्षीस म्हणून विजेत्यांना प्रदान केली जाते. जर विजेत्यांना पुरस्कार स्वीकारायचाच नसेल, तर त्याबरोबर बँकेत जमा झालेली बक्षिसाची रक्कमदेखील विजेत्यांनी परत करावी, असे ते म्हणाले.

मी जे विधान करतो आहे, त्यात मला काहीही चुकीचे वाटत नाही. यापेक्षा अधिक मला या विषयावर काहीही बोलायचे नाही. या बाबतीत इतरांची काय मते आहेत, ती त्यांनी स्पष्टपणे मांडावीत. त्यानंतरच मी याबाबत अधिक काही बोलेन, असेही ते म्हणाले.

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार समारंभात जयराज यांना भयानकम या चित्रपटासाठी २ पुरस्कार मिळाले. तसेच सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कारही याच चित्रपटाला मिळाला.