आशय-विषयातले वैविध्य आणि त्याची दर्जेदार मांडणी हे मराठी चित्रपटांचे शक्तीस्थान आहे. एक चांगला विषय पाहायला मिळेल, या इच्छेने आजचा प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे वळला आहे. किंबहुना, वेगळ्या विषयावरच्या चित्रपटात काम करायला मिळेल, याच समाधानाने कलाकारही अशा चित्रपटांमध्ये जीव ओतून काम करतात. ‘बंध नायलॉनचे’ या चित्रपटातही चांगली संकल्पना आणि चांगले कलाकार हे समीकरण जुळून आले आहे.

सुबोध भावे आणि महेश मांजरेकर, संजय नार्वेकर अशी नावे ऐकल्यानंतर साहजिकच चित्रपटाकडून वाढीव अपेक्षाच असतात. जतीन वागळे दिग्दर्शित ‘बंध नायलॉनचे’चा विचार करताना चित्रपटाची मूळ संकल्पना बऱ्यापैकी प्रेक्षकांपासून लपवून ठेवल्यामुळे कलाकारच प्रामुख्याने आपल्या नजरेसमोर येतात. मात्र हा चित्रपट मूळ ‘बंध नायलॉनचे’ या अंबर हडप लिखित एकांकिकेवर आधारलेला आहे. एकांकि केची संकल्पना खरोखरच नवीन आहे. त्याहीपेक्षा आजच्या काळाशी सुसंगत असलेली ही कथा लेखनात तितक्याच ताकदीने उतरली आहे. मात्र एकांकिकेडून चित्रपटाच्या मोठय़ा अवकाशात शिरताना कथेचा आणि पर्यायाने दिग्दर्शकाचाही जो गोंधळ उडतो त्याचा फटका चित्रपटाच्या मांडणीला बसला आहे.

देवदत्त जोगळेकर (सुबोध भावे)या हुशार तरुणाचे उद्योजक होण्याचे स्वप्न, आई-वडिलांबद्दल त्याच्या मनात बसलेली अढी आणि त्यातून त्यांच्याशी दुरावत गेलेले संबध एकीकडे आहेत. तर दुसरीकडे आपल्या मुलीला आजी-आजोबा हवेत म्हणून तेच दुरावलेलं नातं नव्याने आणतानाही त्याचा अहंकार, त्याच्या मनातील अढी जात नाही. दोन्ही नात्यांमध्ये त्याची घुसमट होत राहते आणि मग गरजेपोटी त्याच्यासमोर आलेला पर्याय तो स्वीकारतो. हा पर्याय नेमका कोणता, हे चित्रपटातच पाहणं रंजक ठरेल. नाती आपण गरज म्हणून पुढे ओढत राहतो, त्याला पर्याय उभे करतो. पण ते पर्याय म्हणजे समृद्ध नाती नसतात त्यामुळे जगणं सोयीस्कर बनत असलं तरी ते समृद्ध होत नाही, हे या संकल्पनेतून मांडण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला आहे. देवदत्त, त्याची पत्नी अनिता (श्रुती मराठे) आणि मुलगी (प्रांजल परब) यांच्या छोटेखानी कुटुंबाचे चित्रण करतानाही आजच्या कामाच्या, स्वप्नांच्या रेटय़ात पती-पत्नीही एक मेकांना गृहीत धरू लागतात. आपल्या मुलांनाही आपण गृहीत धरतो. त्यांची आजी-आजोबांची गरज आपण पाळणाघराच्या किंवा टीव्हीच्या माध्यमातून पूर्ण करायचा कसा प्रयत्न करतो, हे वास्तवही दिग्दर्शकाने दाखवायचा प्रयत्न केला आहे. त्याच वेळी आई-वडिलांची आपल्या मुलांच्या स्वप्नांमागे होणारी फरफट, त्यातून त्यांना येणारं एकाकीपण ही दुसरी बाजूही चित्रपटात येते. यात देवदत्तच्या आई-वडिलांची रघुनाथ आणि मंगल जोगळेकर यांची भूमिका महेश-मेधा मांजरेकर या जोडीने केली आहे. जोगळेकर कुटुंबाच्या माध्यमातून रेशमी नातेबंधांऐवजी नुसतेच नायलॉनसारखे चिवट बंध ओढत राहणारी नाती आज आपण तयार करतो आहोत, याचे भान आणण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला असला. तरी समाजाच्या सर्वच स्तरांचा कथेत समावेश करण्यासाठी जोडलेला पदर कथेला भरकटत नेतो. कथेची मांडणीही सरधोपट पद्धतीने पुढे आल्यामुळे एक चांगली संकल्पना प्रेक्षकांच्या मनाची पकड घेता घेता मागे राहिली आहे.

नवीन विषय आणि सगळ्याच कलाकारांच्या ताकदीचा अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. सुबोध भावेने देवदत्तच्या व्यक्तिरेखेतून आजचा स्वार्थी तरुण कमालीचा छान रंगवला आहे. महत्त्वाकांक्षेच्या बाबतीत कधीही मागे न पडणारा देवदत्त बाप म्हणून मुलीसमोर असाहाय्य ठरतो, तेव्हाचं त्याचं हताश होणंही सुबोधने तितक्याच सहजतेने रंगवलं आहे. त्याला श्रुतीनेही चांगली साथ दिली आहे. महेश आणि मेधा मांजरेकर या चित्रपटात दुहेरी भूमिकेत आहेत. महेश मांजरेकरांनी रंगवलेले आजोबा हा सुखद धक्का आहे. संजय नार्वेकरनेही त्याच्या वाटय़ाला आलेली भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटातील संवादही लक्षात राहण्यासारखे आहेत तरी एवढा नाटय़मय, भावनिक विषय असतानाही चित्रपट प्रेक्षकांची पकड घेण्यात कमी पडतो. चित्रपटात तीन गाणी आहेत. अमितराजने संगीतबद्ध केलेले ‘उठे कल्लोळ कल्लोळ’ हे गणपतीचे गाणे आधीच लोकप्रिय झाले आहे. ‘एक तारा’ हेही गाणे छान झाले आहे.

मांडणीत कमी पडला असला तरी चित्रपटाची संकल्पना आणि विषय आजच्या काळाचे प्रतिबिंब आहे. पूर्णार्थाने कौटुंबिक चित्रपट असलेला ‘बंध नायलॉनचे’चा विषय घरातील तिन्ही पिढय़ांनी समजून घेण्यासारखा आहे. त्यामुळे कलाकारांचा अभिनय आणि संकल्पनेतील नावीन्य यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.

बंध नायलॉनचे

दिग्दर्शक – जतीन सतीश वागळे

निर्माते – सुनील नायर

सिजी नायर

मातृका मोशन पिक्चर्स

पटकथा – अंबर हडप, गणेश पंडित, जतीन वागळे

संगीत –  अमितराज

कलाकार – महेश मांजरेकर, सुबोध भावे, श्रुती मराठे, सुनील बर्वे, मेधा मांजरेकर, संजय नार्वेकर आणि प्रांजल परब.