स्टंट बाइक रायडिंग हा प्रकार मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकांना नवीन असला आणि ‘धूम’ हा चित्रपट गाजला असला तरी स्टंट बायकिंग हा विषय मांडताना आवश्यक असलेली कथा-पटकथा आणि त्याची पडद्यावर केलेली मांडणी याचा संपूर्ण अभाव असल्यामुळे ‘बायकर्स अड्डा’ हा चित्रपट नीरस ठरतो.

‘धूम’ हा चित्रपट आणि काही वर्षांपासून काही वाहिन्यांवर पाहण्यात आलेले स्टंट बायकिंगचे रिअ‍ॅलिटी शो यामुळे स्टंट बायकिंग हा प्रकार सर्वसामान्यांना माहीत झाला असे म्हणायला हरकत नाही. तोपर्यंत उच्चभ्रू-गर्भश्रीमंत वर्गातील तरुणाई ज्यांना स्टंट बायकिंगसाठी लागणाऱ्या महागडय़ा बाइक परवडू शकायच्या एवढय़ांच्या पुरताच हा प्रकार मर्यादित होता. परंतु आता विविध दुचाकी कंपन्यांनी अनेक प्रकारच्या बाइक्स बाजारात आणल्यामुळे तरुणांचे बायकिंगचे गट तयार झाले आहेत. परंतु याबाबत सर्वसामान्यांना खूप काही माहीत असण्याचे कारणच नाही. ‘धूम’ चित्रपट मालिकेमुळे मुख्यत्वे स्टंट बायकिंग परदेशी चित्रपट न पाहणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचले असेही म्हणता येईल. त्यामुळे मराठी चित्रपटासाठी स्टंट बायकिंगचा विषय निवडणे हे खरे तर कौतुकास्पद म्हणावे लागेल. चित्रपटकर्त्यांनी स्टंट बायकिंगचा विषय निवडला त्यासाठी महागडय़ा बाइक्स दाखविणे आणि एकूणच चित्रपटाला ग्लॅमर देण्यासाठी खर्चही भरपूर केला. विकी या मुख्य भूमिकेसाठी संतोष जुवेकर या कलावंताची निवडही योग्य म्हणता येईल. मात्र हे सारे करत असताना कथा-पटकथा-संवाद याकडे लक्ष द्यायचे चित्रपटकर्ते विसरले, असे हा चित्रपट पाहताना प्रेक्षकाला जाणवल्यावाचून राहणार नाही.

विकी आणि त्याचे चार जीवश्चकंठश्च मित्र यांना स्टंट बायकिंगची आवड आहे. ऋषी या सगळ्यांचा स्टंट बायकिंगमधला गुरू आहे. त्याचे दुचाकी दुरुस्तीचे एक दुकान आहे, त्याच्या शेजारीच अनाथ, गरीब मुलांचे ‘आपले घर’ नावाची वास्तू आहे आणि त्याच आवारात विकी आणि त्याचे मित्र राहतात. चित्रपटाच्या शीर्षकात ध्वनित होणारा बायकर्स अड्डा नावाचा एक अड्डा आहे. या अड्डय़ावरती तरुण-तरुणी येऊन स्टंट बायकिंग करतात, बाइक रेसिंग करतात. हा अड्डा चालविणारे दोघेजण स्टंट बायकिंगच्या नावाखाली अमलीपदार्थ विक्री करीत असतात. एक दिवस हा अड्डा उधळून लावण्यासाठी विकी आणि त्याचे मित्र सज्ज होतात.

बायकर्स अड्डा हे नाव पहिल्यांदा विकी घेतो तेव्हा त्याचा बाइक गुरू ऋषी त्याला पुन्हा अड्डय़ाचे नाव न घेण्याबाबत धमकावतो आणि प्रचंड संतापून निघून जातो असे एक दृश्य दाखविले आहे. विकी-ऋषी यांची जिवलग मैत्री आहे असे दाखविले आहे. असे असूनही विकी अड्डय़ाबाबत ऋषीला काहीच विचारत नाही, ऋषीही त्याला काही सांगत नाही आणि तरी विकी बायकर्स अड्डय़ावर जातो असे दाखविले आहे जे अनाकलनीय आहे. चित्रपटाच्या शीर्षकानुसार स्टंट बायकिंगचे निरनिराळे प्रकार पाहायला मिळण्याची अपेक्षाही चित्रपट फोल ठरवितो. स्टंट बायकिंग आणि गुन्हेगारी विश्व यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा अनाथ मुलामुलींचे घर हा एक भलताच प्रकार लेखक-दिग्दर्शकांनी चित्रपट आणण्याचे सबळ कारण प्रेक्षकाला सापडत नाही. विकीच्या भूमिकेतील संतोष जुवेकर यानेच फक्त बऱ्यापैकी अभिनय केला आहे. प्रार्थना बेहरेच्या व्यक्तिरेखेला कथानकात ना स्थान आहे ना महत्त्व. गाण्यांपुरताच तिचा पडद्यावरचा वावर आहे. अन्य सर्व व्यक्तिरेखांचा निश्चित स्वभाव, व्यक्तिरेखांचे रेखाटन अतिशय तकलादू-आगापिछा नसलेले असे झाले आहे. त्यामुळे

विषयाचे नावीन्य असूनही चित्रपटकर्त्यांना त्याची मांडणी कशी करायची हे समजलेलेच नाही असे जाणवत राहते. उत्तम छायालेखन, प्रमुख कलावंत चांगला, बाइक स्टंट्सही चांगले आहेत. मात्र तेच तेच स्टंट्स पुन:पुन्हा दाखविले आहेत ही बाबही खटकणारी.कथानकाची ढोबळ मांडणी, व्यक्तिरेखांचे रेखाटन कच्चे, उगीचच आलेली गाणी-संगीत या सगळ्यामुळे पुन्हा धूम पाहणेच अधिक रंजक ठरू शकेल.

बायकर्स अड्डा

निर्माते – प्रमोद लोखंडे, विजया हरिया

लेखक-दिग्दर्शक – राजेश लाटकर

संवाद – दीपक भागवत

छायालेखक – शकिल ए. खान

संकलन – मन्सूर आझमी

संगीत – विशी-नीमो

कलावंत – संतोष जुवेकर, प्रार्थना बेहरे, श्रीकांत मोघे, श्रीकांत वट्टमवार, राहुलराज डोंगरे, तन्वी किशोर, हृषीकेश मांडके, जय आदित्य गिरी, अनिरुद्ध हरिप, देवेंद्र भगत, निखी राजेशिर्के व अन्य.