मराठी चित्रपटांमध्ये अस्सल मातीतला सिनेमा हे बिरुद मिरविणारा नवा चित्रपट म्हणजे ‘ख्वाडा’ होय. ख्वाडा या शब्दाचा अर्थ ‘अडथळा’ असा आहे. त्याचबरोबर कुस्तीमध्येही खोडा घालतात तोही एक विशिष्ट अर्थ आहे. या दोन्ही अर्थाचे प्रतीक म्हणून या चित्रपटाचे शीर्षक बनले आहे. प्रत्येकालाच आयुष्यात काही ठोस असे ईप्सित साध्य करायचे असते त्यात अनेक अडथळे येतात, त्यावर मात करून पुढे जायचे असते. रूढार्थाने प्रत्येक चित्रपटात नायकाची किंवा अन्य महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचा संघर्ष दाखविलेला असतो. या चित्रपटातही तो संघर्ष आहे. मेंढपाळ कुटुंबाचा हा संघर्ष हाच त्यांचा जगण्याचा भाग आहे हे चित्रपट अधोरेखित करतो. अतिशय अल्प संवाद आणि मेंढपाळांच्या बोलीभाषेतील संवादावर भर असलेला हा चित्रपट प्रत्येक चित्रचौकटीतून हळूहळू उलगडत जातो आणि चित्रपट पाहताना प्रेक्षकांची हळूहळू पकड घेत जातो आणि एका निर्णायक क्षणाला पोहोचतो. खरे तर अस्सल मातीतला सिनेमा असे वर्णन करता येईल.
स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटून गेली तरीही मेंढपाळ समाजाचे वास्तव असे असू शकते हे कोणताही आक्रस्ताळेपणा न करता सहजपणे दाखविण्यात आले आहे हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. चित्रपटातली कऱ्हे कुटुंबाची परिस्थिती आजही असते हे प्रेक्षकाला नव्याने समजते आणि त्यामुळे चित्रपट प्रेक्षकाला अस्वस्थ करतो.
शशांक शेंडे आणि अनिल नगरकर या अभिनेत्यांव्यतिरिक्त बाळू, बाळूची आई, बाळूचा मोठा भाऊ पांडा व अन्य सर्व व्यक्तिरेखांसाठी निवडलेले कलावंत प्रेक्षकांसमोर प्रथमच पडद्यावर आले आहेत. लोकप्रिय कलावंत नसूनही चित्रपटाचे कथानक, संपूर्ण खुल्या आकाशाखाली केलेले छायालेखन, अतिशय उत्कृष्ट ध्वनिसंयोजन, समर्पक संगीत, पाश्र्वसंगीत, वेशभूषा, कला दिग्दर्शन यांतील उत्कृष्टतेची साथ लाभल्याने चित्रपट अपेक्षित परिणाम साधून प्रेक्षकाला सुरुवातीपासून शेवटापर्यंत खिळवून ठेवण्यात प्रचंड यशस्वी ठरतो.
रघू कऱ्हे हा मेंढपाळ कुटुंबाचा प्रमुख. चाळीस-पन्नास मेंढय़ा, रघू कऱ्हेची बायको, मोठा मुलगा, त्याची बायकामुले आणि धाकटा मुलगा बाळू असे बिऱ्हाड आहे. वन खात्याने जमीन घेतल्यामुळे कऱ्हे कुटुंबावर मेंढय़ांसाठी चाऱ्याच्या शोधात गावोगाव भटकण्याची वेळ येते. मेंढय़ांचा ‘वाडा’ घेऊन ते या गावातून त्या गावात स्थलांतर करतात. या स्थलांतरादरम्यान निरनिराळ्या गावात, गावाबाहेरच्या माळरानावर खुल्या आकाशाखाली वास्तव्य करतात, चूल मांडतात, मेंढय़ांची खरेदी-विक्री करतात, मेंढय़ांना न्हाऊमाखू, चारा खायला घालतात आणि पुढल्या प्रवासाला निघतात. मेंढपाळांचे जगणे, त्याचे मर्मभेदक चित्रण या चित्रपटात केले आहे.
जमीन वन खात्याने घेतल्यानंतर आता दहा वर्षे उलटून गेली तरी रघू कऱ्हे न्यायालयात खटला लढवितो आहे. मेंढय़ांचे पालनपोषण करणे, त्यांच्यासाठी चारा शोधत िहडणे यात रघू कऱ्हेचा मोठा मुलगा पांडा आणि धाकटा मुलगा बाळू नेहमीच व्यस्त असतात. त्यातच बाळूचे लग्न करण्याचा प्रस्ताव येतो आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो, पसंती होते, तरी काही कारणास्तव लग्न मोडते म्हणजेच अडथळा येतो हा प्रसंग असो की कुस्तीमध्ये जिंकल्यानंतरही बाळूला सरपंचाकडून इनाम मिळण्याऐवजी मार खावा लागतो तो प्रसंग असो की सरपंच अशोक दादा पाटीलच्या गावाबाहेरील शेतात राहायला आल्यानंतर फुकटात चार-दोन मेंढय़ा त्याला द्याव्या लागतात तो प्रसंग असो अशा अनेक छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून अतिशय साधेपणाने परंतु नेमकेपणाने चित्रपटाचे शीर्षक उलगडून सांगितले आहे.
मेंढपाळ कुटुंबाचा प्रमुख रघू कऱ्हे वयोमान आणि अनुभवानुसार अधिक व्यवहारी झाला आहे. स्थलांतर करावे लागत असल्यामुळे त्या त्या गावच्या रितिरिवाजानुसार जपून राहावे, गावांतील थोरामोठय़ांशी संघर्ष टाळून पडती बाजू घेऊन मार्गक्रमणा करावी या मताचा आहे. तर कुस्तीगीर रांगडा तरुण असलेल्या बाळूचे मत याविरुद्ध आहे. कुणी अडीबाजी केली, उगाचच त्रास देत असेल तर त्याला धडा शिकवायला हवा असा त्याचा खाक्या आहे. परंतु वडिलांपुढे बाळू गप्प बसतो. मात्र पाणी डोक्यावरून जाते तेव्हा निर्णायक पाऊल उचलतो.
स्वातंत्र्यानंतर अनेक ठिकाणच्या ग्रामीण भागांतील नवीन समाजरचना, नवीन संरजामी वृत्ती आणि ज्यांच्यावर अन्याय होतोय असे समाज, त्यातील लोक, त्यांची मानसिकता अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे जगणे संथ परंतु, मर्मभेदी पद्धतीने एकेका चित्रचौकटींतून हळूहळू उलगडून सांगण्याचा प्रभावी प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
बाळू, रघू कऱ्हे, पांडा, अशोक दादा पाटील अशा सर्व प्रमुख व्यक्तिरेखा या व्यवस्थेचाच भाग आहेत हेच चित्रपट पाहताना प्रेक्षकावर ठसत जाते.
मेंढपाळ कुटुंबातील सर्व व्यक्तिरेखा दाखविताना आणि कथानकातील संघर्ष अधोरेखित करताना सबंध चित्रपटात सारे काही गहन-गंभीर वास्तव प्रसंग दाखविलेले नाहीत. तर बाळू हा ग्रामीण भागात राहणारा मेंढपाळ कुटुंबातील असला तरीही त्याचे लग्न ठरत असताना तो तंद्री लावून स्वप्नाळू बनतो हे सारे अकृत्रिमपणे आणि लाजवाब पद्धतीने प्रेक्षकांसमोर येत राहते.
बाळू, सरपंच अशोक दादा पाटील या दोन्ही व्यक्तिरेखा एकेक प्रवृत्ती दर्शवितात. पहिल्या दृश्यापासून ते अखंड चित्रपट पाहताना दिग्दर्शकाची पकड जाणवेल इतके प्रभावी दिग्दर्शन आहे. हळूहळू चित्रचौकटींतून उलगडत जाणाऱ्या या चित्रपटात मेंढपाळ कुटुंब, खुल्या आकाशाखाली बसलेले रघू कऱ्हेचे कुटुंब, मेंढय़ांचे चरणे, मेंढय़ांना आंघोळ घालणे, त्यांचे औषधपाणी करणे, बाळूचे व्यायाम करणे, नदीत डुबक्या मारणे असे छोटय़ा छोटय़ा प्रसंगांची त्यांच्या अंगभूत संथ लयीप्रमाणे चित्रपटाची लय सांभाळली आहे. त्यामुळे चित्रपट किंचित संथ लयीचा वाटत असला तरी प्रभावी ठरतो.
शशांक शेंडे यांनी रघू कऱ्हे अप्रतिम साकारला आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या शहरी तसेच ग्रामीण बाजाच्या भूमिकांपेक्षा सर्वथा निराळ्या छटेची भूमिका करण्याची संधी त्यांना या चित्रपटात मिळाली असून त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे. बाळू आणि सरपंच अशोक दादा पाटील यांच्या भूमिकांमधील अनुक्रमे भाऊसाहेब शिंदे आणि अनिल नगरकर यांनीही जीव ओतून काम केले आहे. भाऊसाहेब शिंदे यांचा हा पहिला चित्रपट आहे असे अजिबात प्रेक्षकाला जाणवणार नाही.

चंद्रशेखर मोरे प्रस्तुत
ख्वाडा
निर्माता – विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
सहनिर्माता – चंद्रकांत मारुती राऊत
लेखक-दिग्दर्शक – भाऊराव कऱ्हाडे
छायालेखक – वीरधवल पाटील
संगीत – रोहित नागभिडे
संकलक – रोहन पाटील
कला दिग्दर्शक – संदीप इनामके
ध्वनिसंयोजक – महावीर साबन्नावर
वेशभूषा – भाऊसाहेब शिंदे
कलावंत – भाऊसाहेब शिंदे, शशांक शेंडे, सुरेखा, अनिल नगरकर, प्रशांत इंगळे, चंद्रकांत धुमाळ, हेमंत कदम, लक्ष्मण मांढरे, इंद्रभान कऱ्हे, योगेश डिंबळे, वैशाली केंदळे, वैष्णवी धोरे, रसिका चव्हाण, ढोकळे मामा, रघुनाथ आंबेकर, सचिन मोरे, दीपक ओहळ, तांबे, स्नेहल भांगे, यशराज कऱ्हाडे, जागृती कुलाल, सोमनाथ वाघमोडे.

Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

सुनील नांदगावकर – sunil.nandgaokar@expressindia.com