रवींद्र पाथरे

मच्छिंद्र कांबळींच्या ‘वस्त्रहरण’चं मराठी रंगभूमीवर पस्तीस-चाळीस वर्षे अनभिषिक्त अधिराज्य सुरू आहे. त्यांच्या पश्चात त्यांची तात्या सरपंचांची हातखंडा भूमिका कुणी त्या ताकदीनं निभावू शकेल का, अशी शंका रसिकांना होती. परंतु अभिनेते संतोष मयेकर यांनी तात्या सरपंचांच्या भूमिकेचं शिवधनुष्य सहजगत्या पेलत पाच हजारी प्रयोगांचं विक्रमी शिखर सर केलं आणि नंतरही ‘वस्त्रहरण’ची घोडदौड सुरूच राहिली. दरम्यान, काही काळाच्या मध्यांतरानंतर पुनश्च एकदा नव्या नटसंचात ‘वस्त्रहरण’ रंगमंचावर अवतीर्ण झालं आहे. नव्या अवतारात असं काय वेगळेपण आहे, असा प्रश्न रसिकांना पडू शकतो. संतोष मयेकरांनी जेव्हा ‘वस्त्रहरण’ केलं तेव्हा मच्छिंद्र कांबळींचीच गादी त्यांनी पुढे चालवली होती. त्यात फार बदल अपेक्षितही नव्हते. फक्त भीती होती ती मच्छिंद्र कांबळींशी संतोष मयेकरांची तुलना होण्याची! त्यामुळे त्यांच्यासमोर मोठं आव्हान होतं. पण त्यांनी ते लीलया निभावलं. तथापि त्यांच्या मालवणी संवादोच्चारांना ऑस्ट्रेलियन गोलंदाज थॉम्पसन-लिली दुकलीच्या वेगवान माऱ्याची जोड होती. त्यानं व्हायचं असं, की अनेक चांगले पंचेस हशा-टाळ्यांच्या प्रतिसादाविना वाया जात. अल्पविराम (पॉझ) घेत प्रेक्षकांना विनोदाचा आस्वाद घेण्या/देण्याची सूट ते देत नसत. साहजिकच ‘वस्त्रहरणा’तली गंमत उणावत असे. नव्या नटसंचात रंगभूमीवर आलेल्या ‘वस्त्रहरणा’त ही उणीव वजा झाली आहे. याचं कारण यातले सगळेच कलाकार स्वत: ची स्वतंत्र ओळख असलेले, आपली भूमिका चवीनं एन्जॉय करणारे असल्यानं स्वाभाविकपणेच प्रेक्षकही त्यात सामील होतात. नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे काळानुरूप त्यात नव्या पंचेसची घातली गेलेली भर. खरं तर पुलंनी जेव्हा ‘देशी वाणाचा भरजरी फार्स’ अशी ‘वस्त्रहरण’ची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती तेव्हा प्रयोगागणिक कलावंतांनी त्यात घातलेल्या नवनव्या उत्स्फूर्त भरीचा वाटाही त्यात होताच. ‘वस्त्रहरण’ची ही खासियत नव्या प्रयोगात अनुभवायला मिळते. कालानुरूप प्रयोगाची खुमारी वाढवण्यासाठी यातल्या कसलेल्या कलावंतांनी जी नवी भर घातली आहे, ज्या नव्या जागा घेतल्या आहेत, त्यानं हे नाटक अधिक झळाळून उठलं आहे.

Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

‘वस्त्रहरणा’ने याआधीच्या दोन पिढय़ांचं मनोरंजन केलेलं आहेच. आता तिसऱ्या पिढीसमोर ते सादर होत आहे. या पिढीला संहितेबाबत काही माहिती असण्याची शक्यता नाही. तेव्हा त्याबद्दल..

कोकणातील दशावतारी लोकनाटय़ाच्या फॉर्ममध्ये हे नाटक आहे. दशावतारात सर्व भूमिका पुरुष कलावंतच करतात. अगदी स्त्रीचीही. कारण त्याकाळी गावंढय़ा गावात स्त्रीभूमिका करायला मुली मिळत नसत. त्यामुळे मुंबईहून एखाद्या हौशी नाटय़संस्थेतली मुलगी नायिकेच्या भूमिकेसाठी आणली जाई. पण ते फार महागात पडे. तिचे नखरे, तिच्यासोबत येणाऱ्या व्यक्तींची बडदास्त, तिचं मानधन वगैरे गोष्टी गाववाल्यांना परवडणाऱ्या नसल्यानं सहसा गावातल्याच थोडय़ा नाजूक पुरुषाला स्त्रीपात्र म्हणून उभं केलं जाई. बरं, नाटक म्हणजे काय, याची फारशी यत्ता न झालेला एखादा तालीम मास्तर नटांचे संवाद घोकवून घेणं आणि हालचाली बसवण्याचं काम करी, एवढंच. स्वाभाविकपणे नाटक कलावंतांच्या बऱ्यावाईट कुवतीवर उभं राही. पौराणिक विषय बहुसंख्य लोकांना परिचित असल्यानं शक्यतो अशाच एखाद्या विषयावरचं नाटक असे. नाटक करताना अनंत अडचणी येत. त्यातून मार्ग काढत कसाबसा एकदाचा ‘प्रयोग’ पार पडे. प्रयोगातही असंख्य गमतीजमती घडत. द्रौपदीचं पात्र रंगवणाऱ्याची बायको ऐन प्रयोगा दिवशीच बाळंत झाल्यानं त्याच्या गैरहजेरीत ‘वस्त्रहरणा’साठी आता नवी द्रौपदी कुठून आणायची, इथपासून ते नाटकाला संगीतसाथ देणारी मंडळी कुणा म्हातारीच्या अंत्ययात्रेत वाजवायला गेल्यानं आयत्या वेळी ती प्रयोगालाच न येण्याची नौबत येण्यापर्यंत नाना अडचणींतून मार्ग काढावा लागे. पुन्हा गावातले रुसवेफुगवे, श्रद्धा-अंधश्रद्धा, मानपान, गावातले टर्रेबाज, इरसाल नमुने यांच्याशी दोन हात करत ‘प्रयोग’ पार पाडणं हे मोठंच दिव्य असे. त्याचंच फर्मास नाटय़रूप म्हणजे ‘सं. वस्त्रहरण’!

गंगाराम गवाणकरलिखित आणि कै. रमेश रणदिवे दिग्दर्शित हे नाटक नव्यानं बसवायची जबाबदारी पहिल्यापासूनच ‘वस्त्रहरण’शी या ना त्या नात्यानं निगडित असलेले दिग्दर्शक मंगेश कदम यांनी चोख पार पाडली आहे. त्यांच्या नावापुढे ‘तालीम मास्तर’ अशी उपाधी असली तरी त्यांनी प्रयोगात विनोदाच्या अनेक नव्या जागा निर्माण केल्या आहेत. काही कोऱ्या जागा नव्यानं भरल्या आहेत. त्यामुळे प्रयोगाला एक विलक्षण ताजेतवानेपण आलेलं आहे. त्यांना उत्तम गुणी कलावंतांची साथ लाभली आहे; ज्यांची स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख आधीपासून आहे. ‘सबकुछ मच्छिंद्र कांबळी’ असं जे रूप पूर्वी ‘वस्त्रहरण’ला होतं, ते त्यामुळे यात टळलं आहे. (अर्थात गोप्या, द्रौपदीकाकू, तालीम मास्तर यांना काहीएक फुटेज तेव्हाही होतं. नाही असं नाही.) इथे एकापेक्षा एक रथीमहारथी विनोदवीर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असल्यानं त्याचा सकारात्मक प्रत्यय प्रयोगात येतो. दिगंबर नाईक यांनी तात्या सरपंचांच्या भूमिकेत मच्छिंद्र कांबळींची तीव्र आठवण जागवली. डोळे बंद केले तर दस्तुरखुद्द मच्छिंद्र कांबळीच सरपंचांच्या भूमिकेत आहेत की काय असं भासावं इतकी ती सच्ची उतरली आहे. मालवणी भाषेचो लहेजो, त्यातली खुमारी, मालवणी माणसाचो इरसालपणा, त्याचो गाळीये ह्य़ा सगळा दिगंबर नाईक कोळून पियालेले आसत. तात्या सरपंच सदेह त्यांच्या रूपात अवतरले आहेत.

‘ऑल द बेस्ट’ फेम देवेंद्र पेम (धर्म) पुत्रद्वय मयुरेश (दु:शासन) व मनमीत (भीम)सह सहकुटुंब नव्या ‘वस्त्रहरण’ची रंगत वाढवतात. पेम-पुत्रांना विनोदाची उत्तम जाण व अनुभवही असल्यानं त्यांची कामं लक्षवेधी झाली आहेत. यातलं गोप्या हे पात्र स्लॅपस्टिक कॉमेडी अन् अर्कचित्रात्मक अभिनय शैलीचा अस्सल नमुना आहे. मुकेश जाधव यांच्या यातल्या  गोप्याने ओरिजिनल ‘गोप्या’ दिलीप कांबळींची प्रकर्षांनं आठवण करून दिली. समीर चौघुलेंनी तालीम मास्तरांचा धांदरट आगाऊपणा मस्त दाखवलाय. दुर्योधन झालेले किशोर चौगुले हे मूळचे अभ्यासू विनोदी अभिनेते असल्याने त्याची झलक छोटय़ा भूमिकेतही नजरेआड होत नाही. अंशुमन विचारे (अर्जुन), प्रणव रावराणे (प्रॉम्प्टर), प्रभाकर मोरे (विदुर), मिथिल महाडेश्वर (धृतराष्ट्र), सचिन सुरेश (देव व भीष्म), शशिकांत केरकर (शकुनीमामा), विश्वजीत पालव व चंदर पाटील (राक्षस), प्रदीप पटवर्धन (अध्यक्ष) यांनीही आपापली पात्रं चोख वठविली आहेत. तात्यांच्या खाष्ट बायकोच्या भूमिकेत किशोरी अंबिये यांनी आवश्यक तो ठसका पुरवला आहे. रेशम टिपणीस यांच्या रूपानं मंजुळाबाईंचं ‘चवळीची शेंग’ हे वर्णन पहिल्यांदाच यथोचित वाटलं. त्यांचं ग्लॅमर ‘वस्त्रहरण’ला झणझणीत गावरान तडका देऊन जातं. नवं ‘वस्त्रहरण’ वेगळं ठरतं, ते या सगळ्यामुळे!