समीर जावळे

चार दिग्दर्शक, चार भयकथा अशी साधी सोपी थीम असलेल्या Ghost Stories Netflix वर रिलिज झाल्या आहेत. या चारही कथा पाहताना आपल्याला भीती, मानवी स्वभाव, भूत ही संकल्पना, गूढ हे सगळे भाव एकवटेले पाहण्यास मिळतात. नारायण धारप, रत्नाकर मतकरी, सुहास शिरवाळकर असे अनेक लेखक आहेत जे त्यांच्या भयकथांसाठी प्रसिद्ध आहेत. त्या भयकथा वाचून आपण आपल्याभोवती एक गूढ तयार करतो. त्यात हरवत जातो. शेवट काय होईल? जे सगळं सुरु झालंय त्याचा शेवट काय होईल? याची उत्कंठा तयार होत जाते आणि शेवटी असा एखादा ट्विस्ट असतो ज्याने आपण पुरते हादरतो. या सगळ्याच लेखकांच्या कथांचं हे वैशिष्ट्य. अगदी असाच काहीसा अनुभव Ghost Stories पाहताना येतो.

पहिली कथा झोया अख्तरने दिग्दर्शित केली आहे. ही कथा आहे समीराची. समीरा (जान्हवी कपूर)  एक नर्स आहे. ती एका म्हाताऱ्या बाईच्या घरी बदली नर्स म्हणून जाते. ही म्हातारी बाई अंथरुणाला खिळलेली आहे. तिला जागचं हलताही येत नाही. कॅथेटर लावलं आहे, नैसर्गिक विधीही जागच्या जागी होतात. या म्हाताऱ्या बाईला एक मुलगा आहे. त्याचं अस्तित्व संवादांमधून जाणवत राहतं. तो दिसत नाही. समीराला हे सांगितलं जातं की म्हातारीला बोलायची सवय आहे. ती बोलते त्याला हो हो म्हणायचं. या समीराचा एक बॉयफ्रेंडही आहे. तो समीराला भेटायला येतो आणि…. पुढे काय घडतं वरवर साधी सरळ वाटणारी कथा कोणतं वळण घेते हे रंजक झालं आहे.

दुसरी कथा आहे अनुराग कश्यप दिग्दर्शित. या कथेचा धागा माया, प्रेम आणि असूया यांच्याशी संबंधित आहे. एक लहान आठ-नऊ वर्षांचा एक मुलगा आहे त्याला आई नाही म्हणून तो दिवसा त्याच्या मावशीजवळ राहतो. रात्री वडिलांसोबत घरी जातो. मावशी त्याचे अगदी आईसारखेच लाड करते, प्रेम करत असते. पण ही मावशी गरोदर आहे. गरोदर मावशीला जेव्हा मूल होईल तेव्हा ती आपल्यावरचं प्रेम कमी करेल का? हा प्रश्न या लहान मुलाला सतावत असतो. या मावशीचा एक भूतकाळ आहे ज्याची तिला भीती वाटत असते. अशा सगळ्या स्थितीत काय घडतं? तो लहान मुलगा काय करतो? अनुराग कश्यपने त्याच्या पद्धतीने या कथेला एक ट्रीटमेंट दिली आहे. ही कथाही चक्रावून टाकते, बुद्धीभेद करते.

 

तिसरी कथा आहे दीबाकर बॅनर्जी दिग्दर्शित. ही कथा या चारही कथांमधली सगळ्यात भयावह आणि हटके कथा आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. एक शिक्षक एका छोट्याश्या गावात येतो. गावाच्या वाटेवर असतानाच एका खड्ड्यात पडतो. तिथून कसाबसा उठून बसतो तर त्याला समोर दिसतो एक लहान मुलगा. तो त्याला एका घरात घेऊन जातो. तिथे त्याला गावाबद्दल एक गोष्ट समजते. ती गोष्ट अशी असते की सुरुवातीला त्याचा यावर विश्वास बसत नाही. मग हा शिक्षक सगळी परिस्थिती डोळ्याने पाहतो आणि गर्भगळीत होतो. पुढे काय घडतं? तो या गावातून बाहेर पडतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कथेत मिळतील. या कथेचा शेवट अगदीच अनपेक्षित झाला आहे.

चौथी कथा करण जोहरने दिग्दर्शित केली आहे. एक गर्भश्रीमंत तरुण आहे. त्याचं कुटुंब आहे. त्याचं एका सुंदर मुलीशी लग्न ठरतं. या मुलाच्या कुटुंबात त्याचे आई वडील आहेत. आजीचं त्याच्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे. या तरुणाचं आणि त्या सुंदर तरुणीचं लग्नही होतं. लग्न करुन घरात आल्यानंतर त्या मुलीला विचित्र अनुभव येऊ लागतात. पुढे काय घडतं? तिला काय जाणवत असतं?  या गोष्टीचा शेवटही भन्नाट आहे. अगदी आपण विचार करत असतो त्यापेक्षा वेगळा. त्यामुळे या घोस्ट स्टोरीज पाहणं हा एक वेगळा अनुभव ठरतो.

आजवर भूत, गूढ, भीती या संकल्पना मुळाशी ठेवून अनेक सिनेमा समोर आले आहेत. मात्र घोस्ट स्टोरीजना दिलेली वेगळी ट्रिटमेंट आणि त्यांचा करण्यात आलेला आगळावेगळा शेवट या दोन मुख्य गोष्टींमुळे या स्टोरीज वेगळ्या ठरतात. कमकुवत हृदयाच्या माणसांनी या स्टोरीज पाहू नये हे नक्की! मात्र ज्यांना हॉरर हा जॉनर आवडतो त्यांनी हा अनुभव टाळू नये.

sameer.jawale@indianexpress.com