04 March 2021

News Flash

खाण्याचा खेळ

मनोरंजन-पर्यावरणीय संदेश यांच्या संयोगातून चित्रपट प्रेक्षकाला हसवण्या-रडविण्याचा कार्यभाग साधतो.

अमेरिकी-कोरियाई प्रथम श्रेणीतल्या कलाकारांची उपस्थिती यांनी हा चित्रपट फुलला आहे.

दक्षिण कोरियाई दिग्दर्शक जून हो बाँग यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग जगभरामध्ये तयार झाला, तो ‘द होस्ट’ नावाच्या त्यांच्या मॉन्स्टर मुव्हीमुळे. त्यानंतर ‘मेमरीज ऑफ मर्डरर’, ‘मदर’ या त्यांच्या चित्रपटांच्या निर्यातकाळात कॅन चित्रपट महोत्सवातून दक्षिण कोरियाच्या चित्रपटांचे खणखणीत नाणे दर वर्षी वाजविले जात होते आणि हॉलीवूड तिथल्या चित्रपटांच्या रूपांतराचे हक्क विकत घेत होते. गेल्या काही वर्षांत ‘माय सॅस्सी गर्ल’पासून ते ‘ओल्ड बॉय’पर्यंत अनेक दक्षिण कोरियाई चित्रपटांचे हॉलीवूड रिमेक फुसके निघाले. तरीही तेथल्या कल्पनांना अमेरिकी दिग्दर्शकांकडून वापरण्याचे थांबलेले नाही. आता त्याहीपुढे जाऊन अमेरिकी सिनेयंत्रणांनी कोरियाई दिग्दर्शकालाच अमेरिकेत चित्रनिर्मितीसाठी पाचारण करून ‘ओकजा’ हा भविष्यात तयार होऊ शकणाऱ्या अन्नभयाबाबतचा चमत्कृतीपूर्ण विनोदीपट तयार केला आहे. हा इंग्रजी भाषेतला कोरियन चित्रपट पर्यावरण आणि निसर्गाशी खेळ करणाऱ्या मानवी प्रवृत्तीवर कोरडे ओढत छानपैकी टाळीफेक मनोरंजन प्रेक्षकाला देतो.

टिल्डा स्विंटन, ब्रॅड पीट यांच्या कंपनीचा आर्थिक वाटा आणि प्रसिद्ध धाडसी लेखक-पत्रकार जॉन रॉन्सन यांच्या सहपटकथाकाराच्या भूमिकेमुळे या चित्रपटाचे निर्मितिमूल्य वाढले आहे. त्यात दिग्दर्शकीय हातोटी आणि अमेरिकी-कोरियाई प्रथम श्रेणीतल्या कलाकारांची उपस्थिती यांनी हा चित्रपट फुलला आहे.

चित्रपटाला सुरुवात होते ती ल्यूसी मिरांडो (टिल्डा स्विंटन) या महत्त्वाकांक्षी उद्यमीच्या पत्रकार परिषदेतील निवेदनातून. २००७ सालामध्ये जुळ्या बहिणीकडून कंपनीचे प्रमुखपद हिसकावून आपणच जगभर विस्तारलेल्या या उद्योगाचे तारणहर्ते कसे आहोत, याचे गुणगान ती गाते. आत्मप्रौढीनंतर तिची जगभरात वाढत चाललेल्या अन्नतुटवडय़ावर चिंता व्यक्त होते आणि त्यावर आपल्या कंपनीने नैसर्गिकरीत्या तयार केलेल्या महाकाय डुकराचे मांस कसे उपयुक्त ठरणार आहे, हे पत्रकारांसह जगाला बिंबवून देते. आपल्या महाकाय डुकरांच्या जनुकीय बदलाबाबतचे वास्तव लपवून ते खरे असल्याचे जगाला पटावे म्हणून वेगवेगळ्या देशांत पाठविण्यात आलेल्या डुकरांची जगाला तब्बल १० वर्षांनी ओळख करून देण्यात येणार असल्याचे ती जाहीर करते. मिरांडो कंपनीच्या दहा वर्षांच्या गुंतवणुकीचे सर्वाधिक चांगले फलित २०१७ सालाच्या सुरुवातीस दक्षिण कोरियाच्या पहाडी भागात ओकजा या हत्ती आकाराच्या डुकरिणीमध्ये पाहायला मिळते. मिजा (अन् सिओ हुआन) नावाच्या अनाथ मुलीसोबत दहा वर्षे वाढलेली ओकजा जंगलामध्ये पूर्णपणे माणसाळलेली पाहायला मिळते. तिथे ती या मुलीची रक्षणकर्ती आणि खेळगडी अशा दोन्ही भूमिकांत वावरत असते. तिची आणि मिजा हिच्या पहाडांवरील जीवघेणी धाडसे मिरांडो कंपनीच्या महत्त्वाकांक्षी धोरणांमुळे लवकरच संपुष्टात येतात. दहा वर्षांनंतर कंपनी पाठविलेल्या परदेशातील महाकाय डुकरांना पुन्हा अमेरिकेमध्ये आणण्याच्या मागे लागते. आजोबांच्या आश्रयास असलेली मिजा कंपनीच्या या कृत्याच्या विरोधात उभी ठाकते. त्यात तिला अमेरिकी-कोरियाई प्राणिमित्र संघटनांचा पाठिंबा मिळतो. मिरांडो कंपनीवर प्राणिमित्र संघटनांच्या हस्तक्षेपामुळे संशय व्यक्त केला जात असताना ल्यूसी मिरांडो नवी शक्कल लढविते. ती सहानुभूती मिळविण्यासाठी मिजालाच अमेरिकेत आपल्या प्राण्यांची नवी दूत म्हणून जगासमोर उभी करते; पण मिजा अमेरिकेत गेल्यानंतर मिरांडो कंपनी आणि ओकजा या दोहोंसाठी गोष्टी सोप्या राहत नाहीत. मनोरंजन-पर्यावरणीय संदेश यांच्या संयोगातून चित्रपट प्रेक्षकाला हसवण्या-रडविण्याचा कार्यभाग साधतो.

दिग्दर्शक आणि आत्यंतिक तिरकस शैलीतील पत्रकारिता करणाऱ्या जॉन रॉन्सन यांच्या पटकथेमुळे विक्षिप्त व्यक्तिरेखांची मांदियाळी या चित्रपटात चांगल्या विनोदाची जागा तयार करते. हॉलीवूडमध्ये बहुतांश गंभीर भूमिकांसाठी ओळखला जाणारा जॅक यिलनहाल येथे महाकाय डुकरांचा विनोदी सदिच्छादूत म्हणून पाहायला मिळतो. कंपनीच्या जाहिरातींमध्ये झळकायची सवय झालेली ही व्यक्तिरेखा आपले महत्त्व कमी झाल्यामुळे पिसाळून मर्कटलीलेत बुडते. टिल्डा स्विंटन हिने अक्कल गहाण ठेवलेली बढाईखोर उद्योजिका आत्यंतिक सुंदर वठविली आहे. प्राणिमित्र संघटनेचा तत्त्वप्रेमी प्रमुख जे (पॉल डानो) आणि त्याच्या चमूची सर्वार्थानी होणाऱ्या कुंचबणाही खास रॉन्सनच्या लेखनाचा बाज राखत उतरल्या आहेत.

इथली सर्वात चांगली गंमत म्हणजे निर्माण झालेल्या अन्नभयावर या उद्योगातील सर्वोच्च यंत्रणा जो उपाय शोधून काढत आहेत, तो आणखी अन्नभयकारक आहे हे पटवून देण्यासाठीचा संदेश पटकथा कायम पाश्र्वभागी ठेवते. तो फारसा प्रचारकी वाटत नाही.  मिजा आणि ओकजा यांचे मैत्र, सोल आणि अमेरिकेतल्या शहरांमध्ये या महाकाय डुकराच्या अवतरण्यातून उडणारा हाहाकार यांचे सीजीआय इफेक्ट्सद्वारे चांगले चित्रीकरण झाले आहे. चित्रपट परिपूर्ण मनोरंजन देत असला, तरी या दिग्दर्शकाच्या इतर कोरियन चित्रपटांच्या तुलनेमध्ये तो उजवा ठरत नाही. शिवाय हॉलीवूडच्या भव्यदिव्य मॉन्स्टरपटासारखेही त्याचे रूप नाही. ओकजाच्या रूपात असलेल्या या भल्या मॉन्स्टरची प्रेक्षकस्नेही आवृत्ती दोन तास प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 3:23 am

Web Title: review of okja korean movie in english
Next Stories
1 जस्टिनवर चाहत्याचा हल्ला
2 स्पायडरमॅनला  हल्कची गरज
3 ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’तून नातेसंबंधांवर भाष्य
Just Now!
X