‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’.. गेल्या दोन वर्षांपासून समाजमाध्यमांवर प्रचंड फिरूनही अनुत्तरित राहिलेला हा बहुचर्चित प्रश्न येत्या २८ एप्रिल रोजी ‘बाहुबली : द कन्क्लूजन’तून उलगडला जाणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अद्याप तीन आठवडे शिल्लक असले, तरी त्याची वातावरणनिर्मिती करण्यासाठी दिग्दर्शक एस. राजामौली आणि वितरक ‘धर्मा प्रोडक्शन’ यांनी ‘बाहुबली : द बिगिनिंग’ हा पहिलाच चित्रपट पुन्हा नव्याने मोठय़ा पडद्यावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. आज, पुनप्र्रदर्शित होत असलेला ‘बाहुबली’ आतापर्यंत अनेकदा टीव्हीवरूनही प्रदर्शित झाला आहे. पण तरीही यंदाच्या शुक्रवारी अनेक सिनेमागृहांनी ‘बाहुबली : द बिगिनिंग’चे खेळ ठेवले आहेत. यंदाच्या शुक्रवारचे हे वेगळेच वैशिष्टय़ म्हणावे लागेल. बाकी चित्रपटरसिकांसाठी हा आठवडा फारसा नावीन्यपूर्ण नसेल, हे नक्की!

बाहुबली : द बिगिनिंग

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या चित्रपटाने कमाईचा इतिहास रचला. व्हीएफएक्सचा मोठय़ा प्रमाणावर वापर करत माहिष्मतीचे साम्राज्य उभा करणारा हा चित्रपट जगभरात वाखाणला गेला. हॉलीवूडच्या दर्जाचे व्हीएफएक्स, तितकीच जोरदार पटकथा आणि कलाकारांचा अभिनय या सगळ्याच आघाडय़ांवर सरस असलेल्या या चित्रपटाची क्रमश: गोष्ट दोन वर्षांनी पाहायला मिळणार असल्याने त्याच्याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. याच पाश्र्वभूमीवर ‘बाहुबली’ पुन्हा पाहणे एक वेगळा अनुभव ठरणार आहे. यात स्मरणरंजनाचा भाग जसा आहे तसेच एकसलग गोष्ट पाहण्याचा अनुभवही प्रेक्षकांना मिळणार आहे.

मुक्ती भवन

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून नावाजला गेलेला ‘मुक्ती भवन’ हा चित्रपटही या आठवडय़ात रीतसर चित्रपटगृहांमधून प्रदर्शित झाला आहे. अत्यंत सुंदर असा विषय असलेला हा चित्रपट खरेतर दुर्मीळ या यादीत मोडणारा आहे. आपल्या अखेरच्या दिवसांत वाराणसीसारख्या पवित्र घाटाचे दर्शन करण्याची इच्छा मनी बाळगून प्रवासाला निघालेले वडील. या प्रवासात ते आपल्या मुलालाही सोबत घेतात. त्यांचा हा प्रवास ‘मुक्ती भवन’ नावाच्या इमारतीपर्यंत येऊन थांबतो. जिथे आयुष्याच्या अखेरचे काही दिवस घालवण्यासाठी खास खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात. या प्रवासात बाप-लेकांमध्ये जो संवाद खुलत जातो त्याचे नाव ‘मुक्ती भवन’ हा चित्रपट आहे. आदिल हुसैन, गीतांजली कुलकर्णी, ललित बेहल यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट शुभाशीष भुतियानी या नवोदित दिग्दर्शकाचा आहे.

लाली की शादी में लड्डू दिवाना

कलाकारांची भलीमोठी फौज, विचित्र व्यक्तिरेखा आणि त्यांच्या एकत्रित येण्यातून निर्माण होणारा सावळा गोंधळा अशा पठडीबाज कल्पनेतूनच उगवलेला ‘लाली की शादी में लड्डू दिवाना’ हा फार वेगळा चित्रपट असेल असे नाही. पण दोन नवरदेवांना नाचवणारी लाली प्रेक्षकांचे चार घटका मनोरंजन नक्कीच करेल.

मनीष हरिशंकर या नवोदित दिग्दर्शकाचा हा चित्रपट टी. पी. अग्रवाल यांनी निर्मिती केला असून विवान शाह, अक्षरा हसन आणि गुरमीत चौधरी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. शिवाय, दर्शन जरीवाला, सौरभ शुक्ला, संजय मिश्रा, रवी किशन यांच्यासारखी नामी मंडळी विनोदाची फोडणी देण्यासाठी आहेत.

मिर्झा ज्युलिएट

मिर्झा-साहिबाँ आणि रोमिओ-ज्युलिएट या जोडय़ांची तीच तीच प्रेमकथा का ऐकायची? त्यामुळे बदलत्या काळानुसार इथे जोडी बदलत तीच प्रेमकथा नव्याने प्रेक्षकांसमोर आली आहे. ‘मिर्झा ज्युलिएट’ या चित्रपटात पिया बाजपेयी आणि दर्शन कुमार ही मुख्य जोडी आहे. ‘मेरी कोम’नंतर सोलो हिरो म्हणून हा दर्शनचा दुसरा चित्रपट असून याचे दिग्दर्शन राजेश राम सिंग यांनी केले आहे.

ब्ल्यू माऊंटन्स

‘ब्ल्यू माऊंटन्स’हाही एका अर्थाने या आठवडय़ात प्रदर्शित झालेला आणखी एक खास महोत्सवांमधून कौतुकास पात्र ठरलेला असा दुसरा चित्रपट आहे. एका लहानशा खेडेगावातल्या तरुणाचा संगीतातील रिअ‍ॅलिटी शोपर्यंतच्या प्रवासाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट सुमन गांगुली यांनी दिग्दर्शित केला आहे. रणवीर शौरी, ग्रेसी सिंग, राजपाल यादव, अरिफ झकेरिया यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बॉक्स ऑफिस

नाम शबाना  – २५.६० कोटी

फिलौरी – २६.१२ कोटी

बद्रीनाथ की दुल्हनिया – ११४.२४ कोटी