अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी होत आहे. मात्र या चौकशीत रिया सहकार्य करत नसल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे. रियाने सुशांतकडून पैसे उकळल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पाटणा पोलिसांनी रियाविरोधात गुन्हा दाखल केला. रियासोबतच तिचा भाऊ शौविक, वडील इंद्रजित आणि माजी मॅनेजर श्रुती मोदी यांनासुद्धा ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे.

गेल्या सात-आठ तासांपासून रियाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान जेव्हा रियाला तिच्या संपत्तीची कागदपत्रे दाखवण्यास सांगितलं असता तिने टाळाटाळ केल्याचं समजतंय. संपत्तीची कागदपत्रे ही सीएजवळ असल्याचं रियाने सांगितलं. जेव्हा ईडीने रियाच्या सीएकडे कागदपत्रांविषयी विचारणा केली असता त्यांनी ते रियाकडेच असल्याचं सांगितलं. रियाला दुसऱ्यांदा कागदपत्रांविषयी विचारले असता तिने लक्षात नसल्याचं सांगत उडवाउडवीची उत्तरं दिल्याचं कळतंय.

सुशांतच्या बँक खात्यातून रियाने १५ कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. ईडीच्या चार अधिकाऱ्यांकडून गेल्या काही तासांपासून रियाची चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयात रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी उपस्थित आहेत. काही तासांच्या चौकशीनंतर शौविक ईडी कार्यालयातून बाहेर पडला. यावेळी त्याने प्रसारमाध्यांना कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. थोड्या वेळाने तो पुन्हा ईडी कार्यालयात आला. तो रियाच्या घरी गेला होता. तिथून काही महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन तो पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाला.