बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी तेथे सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तेथे होती. तसेच किर्ती सेनॉन, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, विवेक ओबेरॉय, उदीत नारायण आणि इतर कलाकार तेथे उपस्थित होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीने सुशांत लग्न बंधनात अडकरणार असल्याचे म्हटले होते. आता एका प्रॉपर्टी एजंटने याबाबत खुलासा केला आहे.

रियाना चक्रवर्तीच्या प्रॉपर्टी एजंटने सुशांत आणि रिया लग्न करणार होते असा खुलासा केला आहे. या प्रॉपर्टी एजंटने ‘आज तक’शी बोलताना त्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य केले. ‘सुशांत आणि रिया राहण्यासाठी घर शोधत होते. त्या व्यतिरिक्त मला काही माहिती नाही’ असे त्याने म्हटले. त्यानंतर त्याला सुशांतने घराचे भाडे देण्याबाबत काही प्रश्न विचारले त्यावर त्याने, ‘नाही. घर भाडे देण्याबाबत कधीच समस्या निर्माण झाली नाही. फक्त त्याच्या रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमुळे सोसायटीमध्ये समस्या निर्माण व्हायच्या’ असे म्हटले.

त्यानंतर प्रॉपर्टी एजंटने, ‘मला वांद्रे येथे घर हवे आहे असे रियाने एकदा सांगितले होते. तसेच ती सुशांत सिंह राजपूतसोबत तेथे राहणार होती आणि ते दोघे लवकरच लग्न करणार होते असे तिने म्हटले होते’ असा खुलासा केला.

सुशांतच्या आत्महत्येनंतर इंडिया टीव्हीने त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. दरम्यान त्याच्या कुटुंबातील एका सदस्याने सुशांत नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अकडणार होता असे म्हटले होते. पण त्या व्यक्तीने कोणाशी लग्न करणार होते हे सांगितले नव्हते.