बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान तिचे फोन डिटेल्स समोर आले. त्यामुळे सोशल मीडियावर रियाच्या चॅटचे तसेच फोन डिटेल्सचे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. त्यामधील काही स्क्रीनशॉटमध्ये रियाचा नंबर देखील दिसत होता. त्यामुळे स्क्रीनशॉटमध्ये दिसणाऱ्या नंबरशी जवळपाससारख्या असणाऱ्या नंबरवर सुशांतचे चाहते कॉल आणि मेसेज करुन रिया असल्याचे समजून धमकी देत आहेत.

नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय सागर सुर्वे या तरुणाचा फोन नंबर आणि रिया चक्रवर्तीचा फोन नंबर यामध्ये एकाच नंबरचा फरक आहे. त्यामुळे त्याला अनेक फोन आणि मेसेज येत आहेत. तसेच कॉल आणि मेसेज करुन अनेकजण त्याला धमक्या देखील देत आहेत. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, सागरला सर्वात पहिला कॉल आला तेव्हा रिया चक्रवर्तीबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा त्याने चुकीच्या ठिकाणी फोन लागला असल्याचे म्हणत कॉल कट केला. त्यानंतर त्याला अनेक फोन आले.

‘मला अनेक मेसेज, व्हॉइस कॉल आणि व्हॉट्स अॅपवर व्हिडीओ कॉल येत आहेत. जेव्हा मी तुमचा कॉल चुकीच्या ठिकाणी लागला आहे असे सांगतो तेव्हा लोकं हे सिद्ध करण्यासाठी मला माझा फोटो पाढवण्यास सांगतात. मी येणाऱ्या कॉलकडे दुर्लक्ष करत आहे. पण गेल्या तीन दिवसांपासून मला सतत कॉल येत आहेत’ असे सागर मुंबई मिररशी बोलताना म्हणाला.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. तर आर्थिक बाबींचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. ईडीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीची दोनदा चौकशी करण्यात आली आहे.