अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसोबतच बिहार पोलीसदेखील करत आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांतची कथित प्रेयसी व अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहार पोलिसांनी रियाच्या बँक अकाऊंटची माहिती काढली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार रियाने गेल्या ९० दिवसांत सुशांतच्या अकाऊंटमधून तब्बल तीन कोटी रुपये खर्च केल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली आहे.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे. त्यामुळे रियाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती बिहार पोलिसांनी मिळवली आहे. सुशांतच्या नातेवाईकांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केलेली आहे.

आणखी वाचा : “म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नव्हते”; अंकिता लोखंडेने सांगितलं कारण

दुसरीकडे सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी वारंवार होत आहे. अभिनेते शेखर सुमन यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भामला फाऊंडेशनचे आसिफ भामला व अरुण मोटवानी उपस्थित होते. शेखर सुमन यांनी राज्यपालांकडे सीबीआयमार्फत चौकशी केली जावी अशी विनंती केली असून तसं निवेदनही दिलं आहे.