दिवंगत अभिनेत सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय अभिनेत्री रिया चक्रवर्तीने घेतला आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी सर्व तपास यंत्रणा आणि सर्वोच्च न्यायालयासमोर खोटी विधाने केल्याचा आरोप रियाने केला आहे. “डॉक्टरांचं प्रीस्क्रिप्शन आणि दोन्ही बहिणींचे चॅट्स पाहिले असता कुटुंबीयांना सुशांतच्या मानसिक स्वास्थ्याविषयी आधीच माहिती होती असं कळतंय”, असं रियाचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार रिया सुशांतच्या कुटुंबीयांविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे.

“औषधांचे प्रीस्क्रिप्शन बहिणींनी एकमेकींना पाठवले होते. ईडी आणि कोर्टासमोर ते खोटं बोलत आहेत. डॉक्टरांचा घेतलेला सल्लासुद्धा बेकायदेशीर होता. जरी ऑनलाइन सल्ला घेतला असला तरी रुग्णाचा इतिहास माहित असल्याशिवाय डॉक्टर औषधं लिहून देत नाहीत. त्यामुळे रिया याविरोधात कारवाई करणार आहे”, असं मानशिंदे म्हणाले.

गेल्या दोन दिवसांत सुशांतच्या बहिणीचे व्हॉट्स अॅप लीक झाले आहेत. त्यातील एका चॅटमध्ये सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी हिच्याकडून त्याची मोठी बहीण नीतू औषधांचं प्रीस्क्रिप्शन मागत असल्याचं स्पष्ट झालं. तर दुसऱ्या चॅटमध्ये सुशांतची बहीण प्रियांका त्याला दिल्लीतल्या एका डॉक्टरकडून औषधांचं प्रीस्क्रिप्शन पाठवताना समोर आलं आहे.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक यांची सीबीआयकडून कसून चौकशी होत आहे. तर सुशांतच्या वडिलांनी केलेल्या पैसे उकळल्याच्या आरोपांवर ईडीसुद्धा रियाची चौकशी करत आहे.