“प्रक्षोभक विधानं करणाऱ्या भाजपच्या नेत्यांविरोधात अद्याप गुन्हा का नोंदवला नाही?” असा सवाल उपस्थित करणाऱ्या न्या. एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश बुधवारी रात्री उशीरा जारी करण्यात आले. हे वृत्त समोर आल्यानंतर क्रेंद्र सरकारवर सोशल मीडियाव्दारे जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान अभिनेत्री रिचा चड्डा हिने देखील एस. मुरलीधर यांच्या बदलीवरुन सरकारवर उपरोधिक टोला लगावला आहे.

काय म्हणाली रिचा चड्डा?

“नशीब ते जिवंत तरी आहेत.” अशा शब्दात रिचाने ट्विटरव्दारे आपला संताप व्यक्त केला. रिचा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंबाबत ती बिनधास्तपणे व्यक्त होते.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्या (CAA) वरून जे हिंसक आंदोलन सुरु आहे. त्याबाबत रिचा सातत्याने सोशल मीडियाव्दारे व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रिचाने न्या. एस. मुरलीधर यांच्याबाबत केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

देशाच्या राष्ट्रपतींनी देशाच्या सरन्यायाधिशांशी चर्चा करुन दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. एस. मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हरिणाया उच्च न्यायलयात केल्याचे या आदेशात म्हटलं आहे. न्या. एस. मुरलीधर यांनी तातडीने पदभार स्वीकारावा असंही यामध्ये म्हटलं आहे. दिल्लीतील हिंसाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. ही सुनावणी संध्याकाळच्या सुमारास संपली त्यानंतर रात्री साडे अकरा पावणेबाराच्या सुमारास न्या. मुरलीधर यांच्या बदलीचे आदेश आले. न्या. मुरलीधर यांनी सुनावणीदरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिल्ली पोलिसांना चांगलेच फैलावर घेतलं होतं. मात्र आता बदली झाल्यामुळे न्या. मुरलीधर दिल्ली हिसांचार प्रकरणाची पुढील सुनावणी करणार नसल्याचे समजते.