देशात लोकसभा निवडणुकीचं मतदान अंतिम टप्प्यात आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय मासिक ‘टाइम’ने आपल्या नव्या अंकाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो प्रकाशित करत त्यांना वादग्रस्त उपाधी दिली. ‘India’s Divider in Chief’ (भारतात दुफळी निर्माण करणारा नेता) असं ‘टाइम’ने मोदींच्या फोटोसह लिहिलं आहे. हाच फोटो शेअर करत बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने मोदींना टोला लगावला आहे.

रिचाने ‘टाइम’चं कव्हरपेज शेअर करत लिहिलं की, ‘जेव्हा तुम्ही परदेशी प्रसारमाध्यमे खरेदी करू शकत नाही.’ रिचाने या ट्विटमध्ये अप्रत्यक्षरित्या भारतीय माध्यमांनादेखील टोला लगावला आहे.

दुसरीकडे ‘टाइम’ मासिकाच्या आशिया आवृत्तीत लोकसभा निवडणूक २०१९ आणि मागील पाच वर्षांतील नरेंद्र मोदींच्या कामकाजावर आधारित आतीश तासीर यांनी प्रमुख लेख लिहिला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला मोदी सरकारची आणखी पाच वर्ष सहन करावी लागणार असा या लेखाचा मथळा आहे. मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप या लेखात केला आहे.