२०१२ साली संपूर्ण जगाचा थरकाप उडवणारं निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरण भारतात घडलं. या प्रकरणातील वास्तविकता ‘दिल्ली क्राइम’ या वेब सीरिजमधून दिग्दर्शिका रिची मेहता यांनी प्रेक्षकांसमोर मांडली होती. या सीरिजला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. एमी पुरस्कार मिळवणारी ‘दिल्ली क्राइम’ ही पहिली भारतीय वेब सीरिज ठरली आहे. परिणामी देशभरातून या सीरिजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान अभिनेत्री रिचा चड्ढा हिने देखील ‘दिल्ली क्राइम’वर स्तुतीसुमनं उधळली होती. परंतु तिने केलेली ही स्तुती काही नेटकऱ्यांना आवडली नाही. त्यामुळे त्यांनी रिचाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. लक्षवेधी बाब म्हणजे रिचाने देखील त्यांच्याच शैलीत ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अवश्य पाहा – ‘व्यायाम करण्यासाठी जीमची गरज नाही’; अभिनेत्रीने साडीवरच मारले पुशअप्स

निर्भया हत्याकांड हे भारतासाठी लज्जास्पद प्रकरण आहे त्याचं कौतुक का करताय? अशा आशयाचं ट्विट करुन काही जणांनी रियाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर तिने, “देशभरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं ते आधी सांगा. त्या प्रकरणाबद्दल सर्वांच्याच मनात दु:ख आहे. पण आम्ही दिल्ली क्राईमला मिळालेल्या पुरस्काराचं कौतुक करतोय. एक भारतीय सीरिज आंतराष्ट्रीय स्थकावर गाजतेय याचा भारतीय म्हणून अभिमान असायला हवा.” अशा आशयाचं ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – हॉटेलमधील वेटर ते प्रसिद्ध अभिनेत्री; पाहा राखी सावंतचा थक्क करणारा प्रवास

करोनामुळे यंदाचा एमी पुरस्कार सोहळा ऑनलाइन पार पडला. अभिनेता रिचर्ड काइंड यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. ‘दिल्ली क्राइम’ या वेबमालिकेत दिल्ली पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे सारे प्रकरण उलगडण्यात आले आहे. या वेबमालिकेच्या वेगळ्या मांडणीमुळे समीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘दिल्ली क्राइम’च्या दिग्दर्शिका रिची मेहता यांनी हा पुरस्कार पुरुषांकडून होणाऱ्या अन्यायाचा सामना करणाऱ्या जगभरातील स्त्रियांनाच नाही तर समस्या सोडवण्याचे आव्हान पेलणाऱ्या स्त्रियांसाठीही समर्पित आहे, अशी भावना पुरस्कार सोहळ्यात बोलून दाखवली. शेफाली शहा, आदिल हुसैन, राजेश तेलंग अभिनीत ‘दिल्ली क्राइम’ या वेबमालिकेला एमी पुरस्कार मिळाल्याबद्दल बॉलीवूडमधील कलाकार-दिग्दर्शकांनीही समाजमाध्यमांवरून शुभेच्छांचा वर्षांव केला आहे.