आगामी ‘तमंचे’ चित्रपटात काम करणारी रिचा चढ्ढा आणि निखिल द्विवेदी या बॉलिवूड जोडीने ईदच्या निमित्ताने तिहार तुरुंगातील कैद्यांना भेट दिली. तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या विनंतीवरून या दोघांनी ईदच्या खास दिवशी कैद्यांची भेट घेतली. तुरुंगातील काही कैद्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या म्युझिक बॅण्डने रिचा आणि निखिलसमोर आपली कला सादर केली. कैद्यांचे कलागुण पाहून भावनाविवश झालेली रिचा म्हणाली, अशा वातावरणातदेखिल इतकी उत्कृष्ट कलाकृती तुम्ही सादर केलीत, आमच्यासारख्या कलाकारांना यातूनच प्रेरणा मिळते. आम्ही तुमचे मनोरंजन करत राहू. निर्दोष कैद्यांची तुरुंगातून लवकर सुटका व्हावी आशी आशा देखिल तिने व्यक्त केली. तिहारमधील या म्युझिक बॅण्डला रिचा आणि निखिलने ‘तमंचे’ चित्रपटाच्या संगीताची सीडी भेट दिली. पोलीस उपायुक्त मुकेश प्रसाद, तुरुंग अधिक्षक राजेश चौहान आणि अन्य वरिष्ठ अधिकारीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. ईदनिमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमास रिचा आणि निखिल या बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावल्याबद्दल तिहार तुरुंग अधिक्षक राजेश चौहान आणि पोलीस उपायुक्त मुकेश प्रसाद यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना चौहान म्हणाले, कैद्यांच्या आयुष्यातील नैराश्य आणि तणाव दूर करण्याचा हा एक प्रयत्न होता. आशाप्रकारच्या कार्यक्रमांमुळे त्यांच्यात चांगला आणि सकारात्मक बदल होण्याबरोबर आनंदाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. ‘तमंचे’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेला निखिल म्हणाला, आम्हाला पुन्हा एकदा येथे भेट द्यायला आवडेल. मोठ्या पडद्यावर कैद्याची भूमिका साकारणे सोपे असले, तरी आपल्या प्रियजनांपासून दूर राहाणे तुमच्यासाठी किती कठीण आहे ते इथे आल्यावर कळले. निर्दोष कैद्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचेदेखिल तो म्हणाला. पोलीस उपायुक्त मुकेश प्रसाद आणि तुरुंग अधिक्षक राजेश चौहान यांनी दोन्ही कलाकारांना तिहार तुरुंगातर्फे मानचिन्ह दिले.