X

..म्हणून रिचाने मानसोपचार तज्ज्ञांकडे घेतली धाव

वेश्या व्यवसाय आणि त्यासाठी होणाऱ्या मानवी तस्करीचा भीषण प्रश्न 'लव्ह सोनिया' या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

वेश्या व्यवसाय आणि त्यासाठी होणाऱ्या मानवी तस्करीचा भीषण प्रश्न ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी तबरेज नुरानी दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा भीषण प्रश्न मोठ्या पडद्यावर संवेदनशीलतेने मांडण्यामागे तब्बल दहा वर्षांची मेहनत आहे. संशोधन, स्वयंसेवी संस्थांसोबत काम, पटकथालेखन, वास्तवदर्शन, शूटिंग या सर्व गोष्टींसाठी दहा वर्षांचा काळ लागला. चित्रपटाने विविध महोत्सवांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि त्यातल्या कलाकारांच्या अभिनयाची सर्वांकडून प्रशंसा होत आहे. पण त्या कलाकारांसाठी भूमिका साकारणं काही सोपं नव्हतं. अभिनेत्री रिचा चड्ढा यामध्ये एका देहविक्रय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे. या भूमिकेचा तिच्या मनावर इतका परिणाम झाला की शूटिंग संपल्यानंतर तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे जावं लागलं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिचाने हा खुलासा केला. ‘सुरुवातीला या चित्रपटाला मी नकार दिला होता. कारण अशी कथा घेऊन माझ्याकडे बरेच दिग्दर्शक आले होते. पण तबरेज यांच्याशी बोलून कथेवरील माझा विश्वास वाढला. तुझी मनापासून इच्छा असेल तरच ही भूमिका साकार असं त्यांनी स्वत:हून मला सांगितलं होतं. चित्रपटाच्या विषयाप्रमाणे कलाकार निवडणं खूप महत्त्वाचं आणि कठीण काम असतं. कारण कलाकारांची निवड चुकल्यास पुढे सर्वच गोष्टी बिघडतात. माझ्या भूमिकेत मी स्वत:ला इतकं झोकून दिलं होतं की शूटिंग संपल्यावर मला मानसोपचार तज्ज्ञांकडे जावं लागलं. त्या परिस्थितीचा आणि भूमिकेचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला होता,’ असं रिचाने सांगितलं.

वाचा : ‘लव्ह सोनिया’साठी अवघ्या बॉलिवूडचा पुढाकार

‘लव्ह सोनिया’मध्ये रिचासोबतच मृणाल ठाकूर, फ्रीडा पिंटो, डेमी मूर, मार्क डप्लास, मनोज बाजपेयी, राजकुमार राव, रिया सिसोदिया, अनुपम खेर, आदिल हुसैन, सई ताम्हणकर आणि सनी पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.