‘मै और चार्ल्स’ या आपल्या आगामी चित्रपटातील व्यक्तिरेखा हुबेहूब साकारता यावी, यासाठी रिचा चढ्ढाने आपल्या आईच्या जुन्या जमान्यातील दागिन्यांचा वापर केला आहे. यावर्षी रिचाकडे बरेच चित्रपट असून, ती कमालीची व्यस्त आहे. चार्ल्स शोभराजच्या जीवनावर आधारित मै और चार्ल्स चित्रपटात ती रणदीप हुडाबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात १९८६ चा काळ दर्शविण्यात आला असल्याने चित्रपटातील रिचाचे लूक त्या काळातील दिसणे गरजेचे होते. याविषयी बोलताना रिचा म्हणते, त्याकाळच्या मुलींचे राहाणीमान आणि फॅशनविषयी काहीच माहिती नसल्याने, मी आईची भेट घेतली. तिने मला काही प्रमाणात मदत केली आणि तरूणपणातले तिचे दागिनेसुद्धा वापरायला दिले. त्याचप्रमाणे त्याकाळातील मुली शाळेत जाताना कशाप्रकारचा युनिफॉर्म परिधान करत याचीसुद्धा मला माहिती करून घ्यायची होती. मुली शाळेत जाताना सलवार-कमीज आणि लांब स्कर्ट घालत असल्याचे आईने मला सांगितले. त्याकाळी आई परिधान करत असलेल्या कानातील रिंगाचा वापर आपण चित्रपटात केला असल्याचेदेखील रिचाने सांगितले.