‘चित्रपटांची संख्या नव्हे गुणवत्ता माझ्यासाठी महत्त्वाची आहे’, असं जेव्हा रिचा चढ्ढासारखी अभिनेत्री म्हणते तेव्हा तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. २००८ साली तिने पहिला चित्रपट केला होता. दिबाकर बॅनर्जीच्या ‘ओय लकी ओय’मध्ये तिची छोटीशी भूमिका होती. सात वर्षांत तिने आठ चित्रपट केले आहेत. सध्या ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवणाऱ्या नीरज घेवान दिग्दर्शित ‘मसान’ या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे कानच्या रेड कार्पेटपासून ते मुंबईच्या गल्लीपर्यंत रिचा चढ्ढाचा बोलबाला झाला आहे. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’, ‘फुकरे’ आणि भन्साळींचा ‘गोलियों की रासलीला – रामलीला’ सारख्या चित्रपटांनी तिची कमान चढती ठेवली आहे. चित्रपट मोठय़ा बॅनरचा आहे की छोटय़ा बॅनरचा याने फरक पडत नाही. चित्रपटातील भूमिका मला काय देऊन जाणार आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, असे रिचा म्हणते.

लहानपणी घरच्यांना नकला करून दाखवण्यापासून तिची अभिनयाची आवड सुरू झाली होती. दिल्लीत थिएटर करताना आणि मग मुंबईत येऊन बॉलीवूडमध्ये ‘स्ट्रगल’ सुरू झालं तेव्हाही मोठय़ा चित्रपटातूनच काम करायचं आहे, अमुक एका पद्धतीचा चित्रपट करायचा आहे, अशी काही विचारांची विभागवारी डोक्यात नव्हती, असं ती स्पष्ट करते. पण, योगायोगाने तिने ज्या भूमिका निवडल्या त्या सगळ्यांनाच प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ चित्रपटातील तिची नगमा खातून जशी लोकांच्या लक्षात राहिली तशीच ‘फुकरे’ची खलनायिका भोली पंजाबनसुद्धा लोकांनी उचलून धरली. ‘मसान’मध्ये तर वाराणसीतील साध्या गावखेडय़ातील मुलीची भूमिका रिचाने केली आहे. नीरज घेवानने ‘मसान’ इतका सुंदर केला आहे की लोकांना तो आवडल्याशिवाय राहणार नाही. ‘कान’ महोत्सवात जेव्हा हा चित्रपट पहिल्यांदा दाखवला गेला तेव्हा संवाद कळत नव्हते तरीही चित्रपटातील विनोद, खटकेबाज संवाद यांना उपस्थित प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत होता. चित्रपटाला भाषा नसते हे नव्याने जाणवलं, असं सांगणारी रिचा त्या वेळी ‘कान’मध्ये मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून रडली होती. आपल्यापासून दूर असलेल्या लोकांना ‘मसान’ कळला, भावला मग आपल्या प्रेक्षकांना का आवडणार नाही? ‘मसान’ ही आपल्या मातीतली गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या लोकोंना तो आवडला तरच या चित्रपटासाठी घेतलेल्या श्रमाचं खरं चीज होईल, असं आपल्याला वाटत असल्याचं रिचाने सांगितलं. सुरुवातीपासूनच निवडक चित्रपट करणाऱ्या रिचाने जाणीवपूर्वक तशी वाट निवडली आहे का?, असं विचारल्यावर चांगला चित्रपट करायचा हे ठरवूनच काम करत असल्याचं तिने सांगितलं. मग ती अनुराग कश्यपचा लघुपट असेल नाही तर नीरज घेवानसारख्या दिग्दर्शकाचा ‘मसान’सारखा चित्रपट असेल. तुमच्या चित्रपटाची पटकथा, तुमची भूमिका, निर्माता, दिग्दर्शक या सगळ्या गोष्टींचा तुमच्या कारकीर्दीवर फरक पडत असतो. त्यामुळे लोकोंना आपल्याबद्दल काय वाटतं, यापेक्षा आपण निवडलेल्या चित्रपटातून, भूमिकांमधून लोकांना काय वेगळं देता येईल हे जास्त महत्त्वाचं असतं आणि याच सूत्राला धरून आतापर्यंतची वाटचाल केली असल्याचं रिचाचं म्हणणं आहे. व्यावसायिक चित्रपटांमध्ये सध्या रिचा सुधीर मिश्रांचा ‘और देवदास’ हा चित्रपट करते आहे. ‘देवदास’च्या अत्याधुनिक अवताराची ही गोष्ट असेल. तर पूजा भट्ट दिग्दर्शित ‘कॅ बरे’ चित्रपटात ती अली फजलबरोबर मुख्य भूमिकेत आहे. ज्या पूजा भट्टचे चित्रपट पाहत आपण मोठे झालो तिच्या दिग्दर्शनाखाली अभिनय करणं हे स्वप्वनत आहे. पूजा स्वत: चांगली आणि वेगळ्या वाटेने जाणारी अभिनेत्री होती त्यामुळे तिच्या दिग्दर्शनाची शैलीही वेगळी असल्याचं रिचाने सांगितलं. साहाय्यक भूमिकांमध्ये अडकून न पडता आपलीच वाट चोखाळत अभिनेत्री म्हणून स्वत:चं स्थान निर्माण करणं हे आपलं ध्येय असल्याचं रिचाने सांगितलं.
बॉलीवूडमध्ये ‘स्ट्रगल’ सुरू झालं तेव्हाही मोठय़ा चित्रपटातूनच काम करायचं आहे, अमुक एका पद्धतीचा चित्रपट करायचा आहे, अशी काही विचारांची विभागवारी डोक्यात नव्हती. पण, योगायोगाने तिने ज्या भूमिका निवडल्या त्या सगळ्यांनाच प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटांची संख्या नव्हे गुणवत्ता माझ्यासाठी महत्त्वाची आहे. –  रिचा चढ्ढा