छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून करिअरची सुरुवात करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. क्रिकेटपटू एम.एस.धोनीच्या बायोपिकमध्ये सुशांतने केलेल्या उत्तम अभिनयामुळे त्याच्यासाठी नव्या चित्रपटांची दारं खुली झाली. त्याचा ‘केदारनाथ’ हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. या चित्रपटानंतर त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत असून त्याचा ‘सोन चिडिया’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाव्यतिरिक्त तो आणखी एका चित्रपटामध्ये झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुशांतने १५ जानेवारीला सैन्य दिनानिमित्त त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘रायफलमॅन’ असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून त्याने इन्स्टाग्रावर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. हा व्हिडिओ म्हणजे ‘रायफलमॅन’चा टीझर पोस्टर आहे. ‘एक आगे बढ़ता दुश्मन, एक बॉर्डर की सुरक्षा और एक बहादुर दिल’, असं कॅप्शनही त्याने या व्हिडिओला दिलं आहे. ‘रायफलमॅन’मध्ये सुशांत एका लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.