अभिनेत्री रिना मधुकरने आजवर विविध मालिका आणि सिनेमांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. यानंतर रीना झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. या मालिकेत ती ‘सानिका देशपांडे’ची भूमिका साकारत आहे.

अभिनेत्री रीना मधुकरने आतापर्यंत तिचा सोशल मिडीया प्रेझेन्स अतिशय ग्लॅमरस ठेवला आहे जो तिच्या चाहत्यांनाही आवडतोय. पण अभिनय आणि कामाच्या बाबतीत तिने नेहमीच वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत. जसे की ‘अजिंठा’ या मराठी सिनेमात तिने आदिवासी पात्राची भूमिका साकारली, तर ‘एजंट राघव- क्राईम ब्रांच’ हिंदी टेलिव्हिजन शोमध्ये फॉरेसिंक डॉक्टरच्या भूमिकेत दिसली. इतकेच नव्हे तर ‘तलाश’ हिंदी सिनेमात पोलिसाचं पात्रं साकारलं आणि ‘३१ दिवस’ या मराठी सिनेमात अंध मुलीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली. थोडक्यात काय तर, रीना मधुकरने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत नाविन्य होतं.

‘मन उडू उडू झालं’ ही रीनाची पहिली मराठी मालिका आहे. याविषयी व्यक्त होताना रीना म्हणते की, “‘मन उडू उडू झालं’ ही माझी पहिली मराठी मालिका त्यामुळे मला असं वाटतंय की मी माझ्या मायेच्या, हक्काच्या घरी परत आली आहे आणि फक्त माझ्याच नव्हे तर मी जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांच्या घरी आली आहे ज्यांना मी आठवड्यातले सलग ६ दिवस भेटणार आहे आणि त्यांच्याच घरातला एक भाग बनणार आहे.

यापूर्वी रीनाने मराठी सिनेमांत काम केले आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीमध्ये देखील रीनाने तिची स्वत:ची ओळख तयार केली आहे, त्यामुळे तिच्या या पहिल्या मराठी मालिकेला मराठी कलाकारांसह हिंदी कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या.