कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्य शासनाकडून तीन मराठी चित्रपट पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. यात ‘रिंगण’, ‘हलाल’, ‘वक्रतुंड महाकाय’ या तीन चित्रपटांचा समावेश आहे. यातील एखाद्या चित्रपटाच्या सहभागाबाबत काही तांत्रिक समस्या निर्माण झाली तर पर्यायी व्यवस्था म्हणून ‘द सायलेन्स’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावेत या उद्देशाने पणजी येथे झालेल्या ४६ व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नऊ चित्रपट पाठविण्यात आले होते. येत्या ११ ते २१ मे या कालावधीत कान्स चित्रपट महोत्सव होत आहे.
कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात चित्रपट पाठविण्याच्या निवड प्रक्रियेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा, राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा आणि अन्य दोन चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी परीक्षक म्हणून काम केलेल्या मान्यवरांची समिती स्थापन करण्यात आली होती.

कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी मराठी चित्रपट पाठविण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. वैयक्तिक पातळीवर निर्मात्याला ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही. या तीन चित्रपटांत मी दिग्दर्शित केलेल्या ‘हलाल’ची निवड करण्यात आली याचा आनंद आहे. चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही जो विषय मांडला तो आता जागतिक पातळीवर पोहोचेल. मराठीतील असे आशयघन चित्रपट भाषेच्या पलीकडे जाऊन जगातील विविध देशांत गेले पाहिजेत. या निमित्ताने ते साध्य होणार आहे.
– शिवाजी लोटण-पाटील, दिग्दर्शक ‘हलाल’
कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सव हा प्रतिष्ठेचा मानला जातो. त्या महोत्सवासाठी निवड समितीने आमच्या चित्रपटाची निवड केली ही आमच्यासाठी नक्कीच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. ही निवड आम्ही सार्थ ठरवू, अशा विश्वास वाटतो.
मकरंद माने, निर्माता-दिग्दर्शक ‘रिंगण’
गेली काही वर्षे आम्ही मेहनत घेऊन ‘वक्रतुंड महाकाय’ हा चित्रपट तयार केला आहे. राज्य शासनाच्या पुढाकाराने आता हा चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार असल्याने आमचे काम आता जागतिक पातळीवर पोहोचणार आहे. मराठी चित्रपट हिंदीच्या तुलनेत कथेच्या दृष्टीने आशयसंपन्न व अधिक गुणात्मक असतो.
– पुनर्वसु नाईक, दिग्दर्शक ‘वक्रतुंड महाकाय’