मराठी चित्रपटसृष्टीमधील ‘सैराट’ या हिट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. या चित्रपटातून रिंकूने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवाता केली. या एकाच चित्रपटाने रिंकूला रातोरात स्टार केले होते. आता रिंकू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सैराट’ चित्रपटानंतर रिंकू ‘कागर’ या चित्रपटात झळकली होती. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आता रिंकूचा आगाची चित्रपट कोणता असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, रिंकू चित्रपटात नव्हे तर एका हिंदी वेब सीरिजमध्ये काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.

रिंकू लवकरच अभिनेता ताहिर शब्बीरसोबत ‘100’ या वेब सीरिजमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ताहिरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर रिंकूचा फोटो पोस्ट केला होता. त्याने पोस्ट केलेल्या फोटोंवरुन रिंकू वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. रिंकूच्या आगामी वेब सीरिजचे चित्रीकरण माटुंगा येथे सुरु असून या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता देखील दिसणार आहे. लारा दत्ता आणि रिंकू राजगुरु या वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. ही वेब सीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.