बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी गुरुवारी सकाळी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यावर मुंबईतील चंदनवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोजके काही नातेवाईक तेथे उपस्थित होते. या कठीण काळात रणबीरसोबत आलिया होती. पण याच काळात ऋषी कपूर यांची मुलगी रिधिमा दिल्लीत होती. लॉकडाउनमध्ये तिला अंत्यसंस्काराला उपस्थित राहत येत नव्हते. त्यामुळे आपल्या वडिलांचं अखेरचं दर्शनही तिला व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं.

रिधिमा ही दिल्लीला राहते. सध्या देशात करोनाच्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने ती दिल्लीत अडकून पडली होती. वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी तिने सरकारकडे मुंबईला जाण्याची परवानगी मागितली होती. सरकारने आधी रस्ते मार्गाने जाण्यास तिला परवानगी दिली. मात्र रस्ते मार्गाने दिल्लीहून मुंबईला पोहोचण्यास १२ ते १४ तासांचा अवधी लागू शकतो. कर्करोगाचे रुग्ण असल्याने ऋषी कपूर यांचे पार्थिव जास्त कालावधीसाठी ठेवता येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर गुरुवारीच अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांना अखेरचं पाहता यावं यासाठी तिच्या मदतीला आलिया भट धावून आली. आलियानं रिधिमाला व्हिडीओ कॉलवर ऋषी कपूर यांचा अंत्यविधी दाखवला… हा कॉल सुरू होता तेव्हा आलिया भट्टच्या डोळ्यांतही अश्रू होते.

ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतानाचे फोटो व्हायरल झाले त्यातील एका फोटोत आलियाच्या हाती कॅमेरा होता. ते पाहून चाहतेही संतापले होते. अनेकांनी आलियाला नेटवर ट्रोलही केले. पण, आलियानं ऋषी कपूर यांच्या मुलीला व्हिडीओ कॉलद्वारे वडिलांचं अखेरचं दर्शन घडवलं, हे सत्य आता समोर आलंय.