अभिनेते ऋषी कपूर सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असून नेहमीच त्यांच्या वादग्रस्त ट्विटसाठी चर्चेत असतात. चालू घडामोडींवर किंवा एखाद्या विषयांवर केलेल्या ट्विटमुळे अनेकदा त्यांना ट्रोलचाही सामना करावा लागला. पुन्हा एकदा ऋषी कपूर त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आले आहेत आणि यावेळी त्यांना ट्रोलिंगमुळे ट्विट डिलीटही करावे लागले आहे.

सध्या देशभरात संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ या चित्रपटावरून बराच वाद सुरू आहे. याच वादासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. ‘जौहर’ ही प्रथा या चित्रपटामुळे चर्चेत आली. पूर्वी राजपूत महिला (राण्या) त्यांचे पती (राजे) युद्धावर गेल्यानंतर परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच किंवा राजाला वीरमरण आल्यानंतर, शत्रूचा आपल्या किल्ल्याला वेढा वाढत असल्याचे लक्षात येताच शत्रूपासून आपली अब्रू वाचवण्यासाठी संपूर्ण साजश्रृंगार करुन अग्नीकुंडात उडी मारतात, त्यालाच जौहर म्हटले जाते. यावरूनच चित्रपटात अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगचा फोटो त्यांनी शेअर केला. दिग्दर्शक करण जोहरसोबतचा त्याचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘चित्रपट प्रदर्शनासाठी आणखी अडथळे निर्माण झाल्यास रणवीर सिंग ‘जोहर’ करेल.’ या ट्विटवरून नेटकऱ्यांनी टीकांचा भडीमार केला. ‘जौहर’ आणि ‘जोहर’ या नावांमध्ये ऋषी यांनी कोटी करायची होती. पण त्यांचा हा प्रयत्न नेटकरांना फारसा आवडला नाही. ट्विट केल्यावर अगदी काही वेळातच ऋषी यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.

लोकांच्या भावनांची खिल्ली उडवल्याचे काहींनी म्हटले तर काहींनी तुमच्यासारख्या जेष्ठ अभिनेत्याकडून अशा प्रकारची टिप्पणी अपेक्षित नाही असे म्हटले. नेटकऱ्यांचा वाढता आक्षेप लक्षात घेता अखेर ऋषी कपूर यांना ते ट्विट डिलीट करावे लागले.