ऋषी कपूर बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. त्यांचे वडिल राज कपूर एक प्रसिद्ध अभिनेता होते. परिणामी लहान असतानाच त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. १९५५ साली प्रदर्शित झालेल्या ‘श्री ४२०’ या चित्रपटामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी एक अट ठेवली होती. जर त्यांना चॉकलेट मिळाले तरच ते अभिनय करतील. त्यांची ही इच्छा अभिनेत्री नरगिस यांनी पूर्ण केली होती.

ऋषी कपूर यांनी दोन वर्षांपूर्वी ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाच्या निमित्ताने जनसत्ताला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते, “त्यावेळी मी केवळ ३ वर्षांचा होतो. वडिल राज कपूर मला चित्रीकरण पाहण्यासाठी सेटवर घेऊन जायचे. १९५४ सालची गोष्ट आहे. त्यावेळी ‘श्री ४२०’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. या चित्रपटात एका लहान मुलाचा सीन होता. तो सीन करण्यासाठी माझे वडिल मला विनंती करत होते. परंतु मी त्यांच्यासमोर एक अट ठेवली. जर मला आत्ताच्या आत्ता या क्षणी चॉकलेट मिळाले तरच मी त्या दृश्यात काम करेन. त्यावेळी अभिनेत्री नरगिस यांनी माझा हा हट्ट पूर्ण केला. अशा प्रकारे केवळ एका चॉकलेटाच्या मानधनावर मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.”

ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून त्यांनी अऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.