बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते ऋषी कपूर यांचा आज ४ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. ऋषी कपूर यांचा जन्म १९५२ साली मुंबईमध्ये झाला. ऋषी कपूर यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात वयाच्या १८व्या वर्षी बाल कलाकार म्हणून केली होती. ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले.

१९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटातील भूमिकेनंतर ऋषी कपूर खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आले. त्यांच्या या भूमिकेने त्यांनी अनेकांच्या मनावर राज्य केले. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची पहिली भेट १९७४ साली प्रदर्शित झालेला ‘जहरीला इंसान’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. या चित्रपटात नीतू आणि ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ऋषी कपूर नीतू यांना सतत चिडवत असत. हळूहळू त्यांच्यामधील मैत्रीच्या नात्याचे प्रेमात रुपांतरण झाले. त्यानंतर त्यांनी ‘खेल खेल’ या चित्रपटात एकत्र काम केले आणि त्यांच्या रिलेशच्या चर्चांना उधाण मिळाले.

ऋषी कपूर आणि नीतू यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा त्यांच्या घरापर्यंत पोहचल्या होत्या. ऋषी कपूर यांचे वडिल राज कपूर यांना हे कळताच त्यांनी ऋषी कपूर यांना नीतूसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला होता. अखेर १९७९मध्ये दोघेही लग्न बंधनात अडकले. लग्नसोहळ्यात ऋषी कपूर चक्कर येऊन पडले होते. लग्नातील गर्दीपाहून ऋषी कपूर यांना चक्कर आली असावी असे नीतू यांनी सांगितले.

दरम्यान ऋषी कपूर आणि नीतू यांच्या लग्नसोहळ्याला अभिनेत्री रेखा यांनीदेखील हजेरी लावली होती. रेखा लग्नाला एका नवरी प्रमाणे नटून आल्या होत्या. गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुकू आणि कपाळवर टिकली असा शृंगार त्यांनी केला होता. रेखा यांनी लग्न सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर रेखा यांनी त्या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर थेट ऋषी कपूर यांच्या लग्नसोहळ्याला आल्या असल्याचा खुलासा केला. गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुकू आणि कपाळवर टिकली हा त्यांच्या चित्रपटातील भूमिकेचा भाग होता असे देखील त्यांनी सांगितले.