बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर गेले काही महिने न्यूयॉर्कमध्ये आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीची माहिती सतत सोशल मीडियावर देत असतात. ऋषी कपूर यांच्या आजारबद्दल समजताच त्यांचे चाहते, आप्तेष्ट त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत होते. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांच्या चौकशीसाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांची भेट घेतली. दीपिका पदुकोण, करण जोहर, विकी कौशल, शाहरुख खान, आमिर खान, या कलाकारांनी त्यांची भेट घेतली होती.
एका वृत्तानुसार, त्यांची प्रकृती आता निरोगी आहे असं सांगण्यात येत आहे. ऋषी कपूर त्यांच्या पत्नीसह सप्टेंबर महिन्यात भारतात परत येणार आहेत. भारतात येण्याआधीच ऋषी कपूर यांनी उपचारादरम्यान तीन चित्रपटांना होकार दिला आहे. नुकतंच, ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये शक्ती कपूर पाहुणे म्हणून आले होते.तेव्हा त्यांनी ही गोष्ट सांगितली. ऋषी कपूर यांच्याबद्दलची एक आठवण सांगितल्यानंतर ते म्हणाले की, “आपण त्यांच्याबद्दल बोलतोय ही खूप आनंदाची बाब आहे. माझं रोज त्यांच्याशी बोलणं होतं. २ किंवा ३ सप्टेंबरला ते मुंबईत परत येत आहेत.”
त्यांनी हेही सांगितले की, “न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांनी दोन – तीन चित्रपटांना होकार कळवला आहे.” ‘द कपिल शर्मा शो’मध्ये शक्ती कपूर यांनी पद्मिनी कोल्हापुरेसह हजेरी लावली. यावेळी त्यांनी करिअरमधल्या बऱ्याच रंजक गोष्टी सांगितल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 15, 2019 7:17 pm