कर्करोगाशी यशस्वी झुंज दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर हे दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकतंच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी ते फोटोशूट केलं असून सोशल मीडियावर चिंटू काका अर्थात ऋषी कपूर यांचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत ऋषी कपूर यांचं निखळ हास्य गोवारीकर यांनी अचूकरित्या टिपलं आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते कर्करोगावरील उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले होते. उपचारादरम्यान अनेक बॉलिवूड कलाकारांनी न्यूयॉर्कला जाऊन त्यांची भेट घेतली. ऋषी कपूर स्वत: सोशल मीडियावर सक्रिय होते आणि तब्येतीविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत होते. या संपूर्ण वेळेत त्यांची पत्नी नीतू कपूर सतत त्यांच्यासोबत होत्या. जवळपास वर्षभराच्या उपचारानंतर ऋषी कपूर ठणठणीत बरे होऊन भारतात परतले आहेत.

आणखी वाचा : …तर ‘अंधाधून’चा क्लायमॅक्स ‘असा’ असता

ऋषी कपूर यांच्या या नवीन फोटोवर चाहत्यांचे भरभरून लाइक्स व कमेंट्स येत आहेत. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे रुपेरी पडद्यावर त्यांच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.