बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते ऋषी कपूर लवकरच भारतात परतणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर सुरू असलेला उपचार आता पूर्ण झाला असून आता ते कॅन्सरमुक्त झाले आहेत. मुंबई पतरण्यासाठी ते खूपच उत्सुक असून लवकरच काम सुरू करण्याची ते वाट पाहत आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत न्यूयॉर्कमध्ये आलेला मजेशीर अनुभव सांगितला. न्यूयॉर्कमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये ऋषी कपूर यांना चुकून वेटर असल्याचं समजलं गेलं होतं.

न्यूयॉर्कमध्ये ऋषी जेव्हाही बाहेर पडायचे तेव्हा तिथेसुद्धा चाहते त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असायचे. ते ज्या ज्या ठिकाणी जायचे तिथे त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी व्हायची. तिथले टॅक्सीचालकसुद्धा त्यांच्याकडून पैसे न घेता सेल्फी घेण्याची मागणी करायचे. एका रेस्टॉरंटमधला किस्सा सांगताना ऋषी कपूर म्हणाले, ”मी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि तिथे बहुतेक बांगलादेशी वेटर्स होते. प्रत्येक वेटर येऊन माझी भेट घेत होता. माझ्याभोवती वेटर्सची होणारी गर्दी पाहून रेस्टॉरंटमधल्या एका अमेरिकन कर्मचाऱ्याला मी तिथे काम करत होतो की काय असं वाटलं. जेव्हा त्यांना मी अभिनेता असल्याचं समजलं तेव्हा त्यांना ओशाळल्यासारखं झालं. पण मी मात्र घरी येईपर्यंत हसत होतो.”

पाहा फोटो- …जेव्हा पाण्यात उतरते आदिनाथ-उर्मिलाची जलपरी

ऋषी कपूर खवय्ये आहेत हे अनेकांना माहितच असेल. मुंबईत परतताच घरचं जेवण आणि चपाती खायची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ”मला मासे खायची खूप इच्छा आहे. इथे न्यूयॉर्कमध्ये मला ते खायला मिळत नाहीत. इथे चपात्यासु्द्धा मिळत नाहीत. नान आणि रोटीच मिळतात. त्यामुळे चपात्यांची खूप आठवण येते,” असं त्यांनी सांगितलं.

येत्या गणेशचतुर्थीला म्हणजेच सप्टेंबर महिन्यात ते भारतात परतणार आहेत.