बॉलीवूडमध्ये मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुस्कार नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याची सांगता काहींसाठी आनंदी तर काहींसाठी निराशाजनक अशी होती. यंदाच्या फिल्मफेअरच्या नामांकनांनी अनेकांना धक्का बसला. पुरस्काराच्या ब-याचशा विभागातून काही महत्त्वाची नावे वगळण्यात आलेली दिसली. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यांमध्ये पक्षपात केला जातो, असा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.  त्यामुळे आता पुरस्कार सोहळ्यांवरून वादविवाद सुरु असतानाच अभिनेता ऋषी कपूर यांनी एक धक्कादायक विधान केले आहे.

[jwplayer ABBOOhmF]

ऋषी कपूर यांचे ‘खुल्लम खुल्ला’ हे आत्मचरित्रपर पुस्तक सध्या बरेच चर्चेत आहे. या पुस्तकातील ब-याचशा गोष्टींबाबत चर्चा होऊ लागली आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ऋषी कपूर यांनी आपण १९७३ साली पुरस्कार विकत घेतल्याचा खुलासा केला आहे. ६२ वर्षीय ऋषी कपूर यांनी यासाठी ‘बॉबी’ चित्रपटाचा संदर्भ दिला आहे. १९७३ साली एका पुरस्कार सोहळ्यात ऋषी कपूर यांना ‘बॉबी’ तर अमिताभ बच्चन यांना ‘जंजीर’ चित्रपटासाठी नामांकन मिळाले होते. याविषयी सांगताना सदर घटनेनंतर आपल्याला फार अपराधी वाटल्याचे ऋषी यांनी सांगितले. ते म्हणाले की, ती माझी चूक होती. याचा उल्लेख मी माझ्या पुस्तकातही केला आहे. पण, त्यानंतरचे सर्वच पुरस्कार मी विकत घेतले असा याचा अर्थ होत नाही. त्यावेळी मी भाबडा, २० वर्षांचा उतकावीळपणे वागणारा मुलगा होतो.
विशेष म्हणजे, या वर्षाची सुरुवात बॉलीवूडमधील प्रसिद्धी सेलिब्रिटींच्या आत्मचरित्रपर पुस्कांतील धक्कादायक खुलाशांनी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहर याचे ‘द अनसुटेबल बॉय’ हे आत्मचरित्र बरेच चर्चेत आहे. ऋषी कपूर यांच्या या पुस्तकाचे शीर्षक हे त्यांच्याच ‘खेल खेल में’ चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावरून घेण्यात आले आहे. सदर पुस्तकात ऋषी यांनी कोणतीही तमा न बाळगता त्यांचे वडिल राज कपूर यांच्या प्रेमसंबंधावरही लिहले आहे. त्यावेळच्या प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला, नर्गिस यांच्यासोबत त्यांच्या वडिलांचे प्रेमसंबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर तरुणपणी डिंपल कपाडिया सोबतच्या स्वतःच्या प्रेमसंबंधाचा खुलासाही त्यांनी यात केला आहे. ‘बॉबी’ चित्रपटानंतर लगेचच डिंपल कपाडियाशी लग्न करणा-या राजेश खन्ना यांच्यासोबत असलेल्या वादाचाही त्यांनी यात उल्लेख केला आहे.

[jwplayer WxCDtKr0]

राज कपूर यांचे मद्यपान आणि व्हिस्कीविषयीचे प्रेम याबाबतही ऋषी कपूर यांनी लिहिले आहे. राज कपूर यांच्यासोबत असलेल्या नात्यावरुन पडदा उचलताना ऋषी कपूर यांनी लिहिले आहे की, ‘माझ्यासाठी राज कपूर माझ्यासाठी वडिलांसोबतच माझे गुरुही होते. नर्गिसजींनंतर मीच एक असा आहे ज्याने त्यांच्यासोबत तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे.’ ऋषी कपूर यांच्या या विधानांमुळे त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रातून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.