गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत वैद्यकिय उपचार घेत असलेले ऋषी कपूर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर आपल्या जुन्या मित्रासोबत फेरफटका मारतानाचा व्हिडिओ ऋषी कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. माझ्या जुन्या मित्रासमवेत मी तणावमुक्त आयुष्य जगत आहे असं ऋषी कपूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ऋषी कपूर यांना भेटून खूप बरं वाटलं. त्यांच्यासोबत भारताविषयी काही गोष्टी बोलता आल्या. दिवस एकंदरच खूप छान गेला असं म्हणत अनुपम खेर यांनीही हा व्हिडिओ आपल्या सोशल अकांऊटवर शेअर केला आहे. अनुपम खेर गेल्या काही महिन्यांपासून एका मालिकेच्या चित्रिकरणासाठी अमेरिकेत वास्तव्यास आहेत.

ऋषी कपूर काही दिवसांपूर्वीच वैद्यकिय उपचारांसाठी अमेरिकेत आले आहेत. वैद्यकिय उपचारांमुळे ते आई कृष्णा कपूर यांच्या अंत्ययात्रेसाठीही उपस्थित राहू शकले नाही. त्यावेळी ऋषी कपूर यांना थर्ड स्टेजचा कॅन्सर झाल्याच्या अफवांनाही पेव फुटलं होतं. मात्र या केवळ अफवा असून ऋषी कपूर यांच्या काही चाचण्या होणे बाकी आहे. त्यांना काय त्रास आहे आणि ते कोणत्या आजाराने त्रस्त आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही असं कपूर कुटुंबियांनी स्पष्ट केलं आहे.