जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी समर्थन केले आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा पाकिस्तानचा भाग असून पीओकेला पाकपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे वादग्रस्त विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. त्यावर ट्विट करत ऋषी कपूर यांनी त्यांचे समर्थन केले.

ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘फारुख अब्दुल्लाजी, सलाम! मी तुमच्या वक्तव्याशी पूर्णपणे सहमत आहे. जम्मू- काश्मीर आपला आहे आणि पीओके त्यांचा. या एकमेव मार्गाने आपण ही समस्या सोडवू शकतो. मी ६५ वर्षांचा आहे आणि मृत्यूपूर्वी मला एकदा पाकिस्तान पाहायचे आहे. माझ्या मुलांनी त्यांच्या कुटुंबाची पाळेमुळे पाहावीत, अशी माझी इच्छा आहे. आता करून टाका.’ ऋषी कपूर यांचे पूर्वज फाळणीपूर्वी पाकिस्तानात राहत होते.

भारताकडे जम्मू-काश्मीर असून तो भारताकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पाकव्याप्त काश्मीर हे पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि तो भाग पाककडून हिरावून घेऊ शकत नाही, हेच वास्तव आहे आणि ते स्वीकारले पाहिजे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले होते. दोन्ही देशांमधील काश्मीरच्या जनतेला स्वायत्तता देण्याची गरज आहे. स्वातंत्र्याची मागणी करणे ही बेईमानी आहे. त्यामुळे स्वातंत्र्याची मागणी करणे अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. काश्मीर प्रश्नावर भारताने पाकिस्तानशी चर्चा करावी, असा सल्लाही त्यांनी मोदी सरकारला दिला होता.