बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर हे सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव्ह असतात. अनेक वेळा ट्विटरच्या माध्यमातून ते समाजात घडणाऱ्या घटनांवर त्यांचे विचार मांडत असतात. विशेष म्हणजे त्यांचे हे ट्विट व्हायरलही होतात. त्यातच आता त्यांनी आणखीन एक ट्विट केलं आहे. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे सरकारवर निशाणा साधला आहे. बॅक घोटाळ्यांवर त्यांनी आवाज उठविला असून या प्रकरणी दोषी असणाऱ्यांना शिक्षा करण्याची विनंतीही केली आहे. इतकंच नाही तर हे ट्विट करत असताना त्यांनी ‘श्री 420’ या चित्रपटाची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे.

‘देशातील आजची स्थिती पाहता मला माझ्या वडिलांचा ‘श्री 420′ या चित्रपटाची आठवण येते. भ्रष्टाचाऱ्यांनी बाजार मांडला आहे, आज तेच होतांना दिसतंय? बॅक घोटाळे होतायेत. या भ्रष्ट लोकांना पकडण्याची गरज आहे. सत्याच्या मार्गाने जगणाऱ्यांना त्यांचा हक्क द्या, सरकार कृपया ऐका’, असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं आहे.

दरम्यान, ऋषी कपूर नुकतेच पत्नी नीतू कपूरसोबत मुंबईमध्ये परतले आहेत. त्यांच्यावर न्युयॉर्कमध्ये उपचार सुरु होते. कर्करोगाशी यशस्वी झुंज दिल्यानंतर त्यांनी एक फोटोशूट केलं होतं. प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी ते फोटोशूट केलं असून सोशल मीडियावर चिंटू काका अर्थात ऋषी कपूर यांचा फोटो चांगलाच व्हायरल झाले.