जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर केलेल्या भ्याड हल्ल्यावर आधारित ” उरी -द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. ‘उरी’ने अवघ्या १० दिवसांमध्ये १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. यावरुनच या चित्रपटाची क्रेझ किंवा लोकप्रियता किती आहे हे दिसून येत आहे. चाहत्यांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटींही या चित्रपटाला पसंती देत असून अभिनेता ऋषी कपूर यांनी हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर तात्काळ या चित्रपटाविषयीची प्रतिक्रिया दिली.

आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे कायम चर्चेत राहणारे ऋषी कपूर सध्या एका आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर न्युयॉर्कमध्ये उपचार सुरु आहे. या उपचारादरम्यान त्यांनी ‘ उरी -द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर ऋषी यांनी तात्काळ त्यांची प्रतिक्रिया देत हा चित्रपट आणखी कमाई करेल असं ट्विट केलं आहे.

अभिनेता विकी कौशल आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचं ऋषी कपूर यांनी तोंडभरुन कौतुक केलं आहे. ‘भारतीय लष्करावर आधारित ‘उरी’ हा चित्रपट नुकताच पाहिला. मला वाटत नाही या पूर्वी अशा चित्रपटाची निर्मिती झाली असेल किंवा यापुढेही अशा चित्रपटाची निर्मिती होणं शक्य नाही. हा चित्रपट भारत-पाकिस्तान यांच्यावर आधारित नसून दहशतवाद्यांशी लढा देणाऱ्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या जवानांवर आधारित असल्याचं वाटतं’, असं ऋषी कपूर म्हणाले.

पुढे ते असंही म्हणाले, ‘हा चित्रपट पाहून एक वेगळीच उमेद निर्माण होते. इतकंच नाही तर आपला दृष्टीकोनही बदलतो. या चित्रपटात विकीचा अभिनय पाहण्यासारखा आहे’. ‘उरी’ने १०० कोटींचा टप्पा पार केल्यामुळे चित्रपटाची टीम हे यश सेलिब्रेट करत आहे. केवळ १० दिवसांमध्ये १०० कोटी कमाविणारा हा चित्रपट येत्या आठवड्याभरात १५० कोटींचा टप्पादेखील पार करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.