बॉलिूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी गुरुवारी (३० एप्रिल) सकाळी जगाचा निरोप घेतला.त्यांच्या निधनाने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. ऋषी कपूर गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होते. गुरुवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांचा रुग्णालयातील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. याप्रकरणी ‘द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) कडून सर एच.एन . रियायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलविरोधात तक्रार दाखल करण्यात आली  असून नोटीसही बजावली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ सर एच.एन. रियायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील अतिदक्षता विभागातला आहे. यात ऋषी कपूर हे बेडवर झोपले असून यांना श्वासोच्छवास घेण्यास अडचण येत असल्याचं दिसून येत आहे. ऋषी कपूर यांचं निधन झाल्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला,त्यामुळे FWICE त्यावर आक्षेप नोंदविला आहे. FWICE चे अध्यक्ष अशोक पंडित यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत या व्हिडीओवर आक्षेप घेतल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या अशोक पंडित यांचं ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइसने (FWICE) या व्हिडीओला अनैतिक ठरवत एका गौरवशाली व सन्मानपूर्ण जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या अधिकारांचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. सोबतच ‘एचएन हॉस्पिटलमधून ऋषी कपूर यांचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ अनैतिक आहे. कोणतीही परवानगी न घेतला हा व्हिडीओ काढण्यात आला आहे, असं अशोक पंडित यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान,  ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी मुंबईत निधन झालं. त्यांना  २९ एप्रिल रोजी मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.