अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा देशमुख यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत दोघांनी याबद्दलची माहिती दिली. डॉक्टर दिनाचं औचित्य साधत दोघांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

“रितेश आणि मी फार आधीपासून अवयवदानाचा विचार करत होतो. आज डॉक्टर दिनाचं औचित्य साधत आम्ही आमचे अवयव दान करण्याचा निर्णय घेत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल आम्ही डॉ. नोझर शेरिअर आणि FOGSI चे आभार मानतो. एखाद्याला सर्वोत्तम भेट द्यायची असेल तर जीवनदान हीच भेट सर्वोत्तम असू शकतो. या उपक्रमात सहभागी व्हा आणि तुम्हीसुद्धा अवयवदान करा”, असं आवाहन दोघांनी केलं आहे.

अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकतं, थांबलेलं जगणं सुरू होऊ शकतं. त्यामुळे अनेक कलाकार अवयवदानाचं महत्त्व पटवून देताना दिसतात. रितेश- जेनेलियाच्या आधी अनेक सेलिब्रिटींनी अवयवदान केलं आहे.

अवयवदान

रुग्णाच्या शरीरातील एखादा अवयव निकामी झाल्यानंतर त्याच्या शरीरात दुसऱ्या व्यक्तीचा सुस्थितीतील अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते. यातून त्या व्यक्तीला नवे आयुष्य मिळू शकते. अवयवदान ही प्रक्रिया दोन पद्धतीने पार पाडली जाते. जिवंत व्यक्ती आपल्याच नातेवाईकाला अवयवदान करू शकते आणि दुसरे म्हणजे मेंदूमृत रुग्णाचे अवयवदान करता येतात.