पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लॉकडाउन करण्याची घोषणा केल्यापासून सामान्य नागरिकांपर्यंत सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण घरात बसून आहे. केवळ अत्यावश्यक गोष्टींसाठीच नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. या लॉकडाउनमुळे घरात बसलेला प्रत्येक नागरिक विरंगुळ्यासाठी काही ना काही काम करत आहे. यात सेलिब्रिटीदेखील त्यांचा वेळ घालविण्यासाठी आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवत आहेत. यात अभिनेता रितेश देशमुखदेखील त्याचा वेळ विविध गोष्टींमध्ये मन रमवत असून सध्या त्याला एक प्रश्न सतावत आहे. हा प्रश्न त्याने टिकटॉकच्या माध्यमातून नेटकऱ्यांना विचारला आहे.

कलाविश्वात सक्रीय असलेला रितेश सोशल मीडियावरही तितकाच अ‍ॅक्टीव्ह आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाप्रमाणेच तो टिकटॉकवरही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. याच टिकटॉकवरचा रितेशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्याला सध्याच्या परिस्थिती पाहता एक प्रश्न पडला असून हा प्रश्न केवळ विनोदाचा भाग असल्याचं पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केल्यामुळे ऑफिस, शाळा, महाविद्यालये सारं काही बंद आहे. त्यामुळे सगळ्यांकडेच भरपूर फावला वेळ (फ्री टाइम) आहे. त्यामुळे सध्या ‘नेटपॅक फ्री आहे की आपण हेच समजत नाहीये’, असा मजेदार प्रश्न रितेशने विचारला आहे.

दरम्यान,  करोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग झपाट्यानं होतं असल्यामुळे त्याची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे पुढील २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करत ही माहिती दिली.