रितेश देशमुख आणि रवी जाधव यांच्या ‘बँजो’ या चित्रपटाची चर्चा सगळीकडेच होत आहे. रवी जाधव दिग्दर्शित पहिल्या हिंदी चित्रपटात रितेशची भूमिका ही त्याने आधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा जरा वेगळी आहे. या भूमिकेसाठी त्याने खास मेहनत घेतली आहे.  चित्रपटात रितेश बँजो वादकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी त्याने बँजो वादनाचे प्रशिक्षणही घेतले. इतकेच नाही पण, केवळ दिग्दर्शकाची मागणी म्हणून रितेशने नाल्यातून एण्ट्री केलीयं.
नुकताचं बँजोचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये घाणीने माखलेला रितेश नाल्यातून एण्ट्री करताना दाखविण्यात आलायं. त्याविषयी सांगताना रवी म्हणाला की, बहुतेक अभिनेते पडद्यावर बाईकवरुन, घोड्यावरुन एण्ट्री करतात पण माझा हिरो नाल्यातून एण्ट्री घेणार. रिअल लोकेशन्सवर शुटिंग करण्यावर माझा विश्वास आहे. रितेशला या चित्रपटाविषयी मी कल्पना दिली आणि शुटिंगबाबत त्याला काही अडचण नव्हती. संपूर्ण चित्रीकरण वरळी येथे करण्यात आलं असून २ तासात ते पूर्ण झालं. फायनल शॉटच्या वेळी विशेष काळजी घेण्यात आली. डॉक्टर्ससुद्धा त्यावेळी सेटवर हजर होते, असे रवीने सांगितले. २३ सप्टेंबर रोजी ‘बँन्जो’ प्रदर्शित होणार आहे.