लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अमित देशमुख व रितेश देशमुख यांना लातूर तालुक्यातील सारसा येथील ११ एकर जमिनीवर चार कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज दिल्याची कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. याप्रकरणी अखेर रितेश देशमुखला ट्विटरच्या माध्यमातून खुलासा करावा लागला. ‘मी व अमित देशमुखने कोणते कर्ज घेतलेच नाही’, असं रितेशने ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

‘सोशल मीडियावर ही कागदपत्रे चुकीच्या उद्देशाने पसरवली जात आहेत. मी व अमितने कोणतेच कर्ज घेतलेले नाही. त्यामुळे कोणत्याही कर्जमाफीचा प्रश्नच उद्भवत नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका,’ असं रितेशने ट्विटरवर म्हटलंय. सामाजिक कार्यकर्त्या मधू किश्वर यांनी ही कागदपत्रे सोशल मीडियावर पोस्ट केली होती. मात्र रितेशच्या ट्विटनंतर त्यांनी आपले ट्विट डिलीट केले. मात्र न घेतलेल्या कर्जामुळे हकनाक अमित व रितेश देशमुखांची बदनामी मात्र जोरदार झाली.

काय आहे प्रकरण?
२०११ साली ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी विकास सहकारी कारखान्याची आठ प्रकरणे बँकेकडे आली. एका ऊस तोडणी यंत्रासाठी वैयक्तिक सहभाग वगळता ७८ लाख रुपयांची कर्जाची मागणी होती. ज्या शेतकऱ्याच्या नावावर २५ एकर बागायती जमिनीचे क्षेत्र आहे त्यांना हे कर्ज मंजूर करता येईल, असे तेव्हा धोरण होते. आठ प्रकरणांपैकी सहा प्रकरणे बाभळगाव येथील देशमुख कुटुंबीयांच्या घरातील होती. वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या नावे दोन, रितेश देशमुख यांच्या नावे एक, धीरज देशमुख यांच्या नावे एक व आदिती अमित देशमुख यांच्या नावे दोन प्रकरणे होती. आदिती देशमुख्य यांच्या नावावर पुरेशी जमीन बाभळगाव येथे नसल्याने सहतारणधार म्हणून अमित देशमुख व रितेश देशमुख यांच्या नावावर लातूर तालुक्यातील सारसा येथील ११ एकर जमीन होती ती तारण ठेवून कर्ज मंजूर करण्यात आले.

कर्ज मंजूर झाल्यानंतर त्या जमिनीच्या क्षेत्रावर बोजा चढवण्यात आला. त्यावेळच्या बँकेच्या नियमानुसार कर्जदाराने जितके कर्ज उचलले आहे त्याच्या तिप्पट रक्कम जमिनीवर बोजा चढवला जात असे. त्यातूनच अमित देशमुख व रितेश देशमुख यांच्या नावावर चार कोटी ७० लाख इतका कर्जाचा बोजा चढवण्यात आला.

कर्ज मंजुरीनंतर प्रत्यक्षात आदिती देशमुख व रितेश देशमुख यांनी कर्ज उचललेच नाही व मशीनही खरेदी केली नाही. उर्वरीत तीन मशीन खरेदी झाल्या व २०१६ पर्यंत कर्जाची रक्कमही फेडण्यात आली. मात्र, जमिनीवर चढवलेला बोजा कमी करून न घेतल्यामुळे तो तसाच राहिला.