दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहर यांच्या ‘मिर्जियाँ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री सैयामी खेर लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी ‘माऊली’ या चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटासाठी संपूर्ण टीम सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सैयमीने पहिल्यांदाच जेजुरी आणि पंढरीची वारी केली आहे.

रितेशचा ‘माऊली’ येत्या १४ डिसेंबरला महाराष्ट्रासह परदेशातही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाची टीम प्रचंड मेहनत करत असून महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ते चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. यामध्येच त्यांनी जेजुरी आणि पंढरपुरची वारी केली. विशेष म्हणजे या प्रमोशनच्या निमित्ताने सैयामीने पहिल्यांदाच जेजुरी आणि पंढरपूर पाहिलं.

दरम्यान, चित्रपटातील सर्व मुख्य कलाकार रितेश देशमुख, जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव हेदेखील यावेळी सैयामीसोबत होते. जेजुरीमध्ये खंडोबा आणि पंढरपुरमध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने सैयामी खूप आनंदात असल्याचं यावेळी पाहायला मिळालं.