‘हमशकल्स’ आणि ‘एक व्हिलन’ या नुकत्याच बॉलीवूड तिकीटबारीवर यशस्वी झालेल्या चित्रपटांनंतर अभिनेता रितेश देशमुखकडे आता यशराज फिल्मचा ‘बँकचोर’ चित्रपटाचा प्रस्ताव आल्याचे समजते. विशेष म्हणजे, याआधी या चित्रपटातून विनोदवीर कपील शर्मा बॉलीवूडमध्ये ‘एण्ट्री’ घेण्याच्या तयारीत होता परंतु, काही कारणास्तव  कपील शर्मा या चित्रपटाचा भाग नसणार असल्याचे यशराज फिल्मच्यावतीने जाहीर करण्यात आले होते.
‘यशराज फिल्म’च्या ‘बँकचोर’मधून कपील शर्मा ‘आऊट’
तसेच हा निर्णय कपील आणि यशराज फिल्मने एकत्रितरित्या घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर आता या चित्रपटातील नायकाच्या भूमिकेसाठी रितेश देशमुखला विचारणा केली गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार ‘बँकचोर’ हा चित्रपट रोमांचक-विनोदी कथेवर आधारलेला असून यामध्ये तीन जणांचा बँकेवर दरोडा टाकण्याचा मनसुबा आणि त्यानंतर एकामगोमाग घडत गेलेले रोमांचक प्रसंग विनोदशैलीतून साकारण्यात येणार आहेत.