‘खिलाडियों का खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारला हरवणं तितकं सोपं नाही. मग ते अभिनयाच्या बाबतीत असो किंवा कोणत्याही खेळाच्या बाबतीत. ‘केसरी’ या चित्रपटातील अक्षयची सहकलाकार परिणीती चोप्राला सेटवर अक्षयसोबत ‘ल्युडो’ खेळणं चांगलंच महागात पडलं. सेटवर फावल्या वेळेत परिणीतीने अक्षयशी पैज लावली आणि ती हरली. हरलेल्या पैजेचे पैसे अक्षयला देतानाचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोवरून अभिनेता रितेश देशमुखने अक्षयची फिरकी घेतली आहे.

परिणीतीने शेअर केलेल्या फोटोवर रितेशने ट्विट केलं, ‘अक्षय देशात सर्वाधिक करदाता कसा ठरला हे तुम्हाला कळलंच असेल. आम्ही सगळे सहकलाकार त्याला यात मोठी मदत करतो.’ रितेशच्या या ट्विटवर अक्षयनेही मजेशीर उत्तर दिलं. ‘धन्यवाद रितेश. आज दुपारी तू काय करतोयस. आपण दोघं मिळून ल्युडो खेळुयात का?,’ असा प्रश्न विचारत अक्षयने रितेशची गंमत केली. यावर हरण्याच्या भीतीने रितेश म्हणाला, ‘नाही, तू डोळ्यांवर पट्टी बांधून खेळत असशील तर मी खेळीन.’

अक्षय आणि परिणीतीची मुख्य भूमिका असलेला ‘केसरी’ हा चित्रपट येत्या २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे. ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर या चित्रपटाची कथा आधारीत आहे.