राजस्थानमधील करौली येथे देखील एका मंदिराच्या पुजाऱ्यास जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंदिराच्या जमिनीवरून सुरू असलेल्या वादातून बाबूलाल नावाच्या पुजाऱ्यास जिवंत जाळण्यात आले. त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेवर अभिनेता रितेश देशमुख याने प्रतिक्रिया दिली. गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक समाजात हिंसा पसरवत आहेत, असं म्हणत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.

“राजस्थानमध्ये जमिनीच्या वादावरुन एका मंदिराच्या पुजाऱ्याला जिवंत जाळले. ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. अशा प्रकारची कृत्य करुन काही लोक समाजात हिंसा पसरवत आहेत. मला आशा आहे की या गुन्हेगारांना पोलीस लवकरच पकडतील आणि त्यांना योग्य ती शिक्षा मिळेल.” अशा आशयाचं ट्विट करुन रितेश देशमुख याने आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यापूर्वी उत्तर प्रदेशमधील एका मंदिराच्या पुजाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे आता स्थानिक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत आता सर्वांच्याच मनात प्रश्न निर्माण झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, जमिनीच्या वादातून पुजाऱ्याची हत्या झाली असल्याची माहिती समोर येत आहे. अतुलबाबा उर्फ सम्राट दास हे येथील राम-जानकी मंदिरात पुजारी होते. मागील दोन वर्षांपासून ते या ठिकाणी राहत होते. हे मंदिर गोंडा येथील इटियाथोक पोलीस ठाणे अंतर्गत तिर्ते मनोरमा येते आहे. रात्री साधारण २ वाजेच्या सुमारास अतुलबाबा यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.