अभिनेता म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या रितेशने ‘बालक पालक’ या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. अभिनेता-निर्माता अशी दुहेरी भूमिका साकारणा-या रितेशला चित्रपट दिग्दर्शनही करायला आवडेल, असे त्याने म्हटले आहे.
“चित्रपट दिग्दर्शन करणे ही उत्तम गोष्ट आहे…. अभिनयदेखील उत्तम आणि निर्मिती क्षेत्रातही मी आनंदी आहे. एक निर्माता म्हणून तुम्ही संपूर्ण चित्रपट विकत घेता, तर दिग्दर्शक म्हणून तुम्ही एक निर्माता असता. भविष्यात मी चित्रपट दिग्दर्शन करू शकतो असं मला वाटतं,” असे रितेश एका मुलाखतीत म्हणाला. ‘यलो’ या चित्रपटासाठी रितेशला सर्वोत्कृष्ट निर्माता म्हणून ३ मेला ६१व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. कै. नेता विलासराव देशमुख यांचा मुलगा असलेल्या रितेशला एक नागरिक म्हणून आपल्या राष्ट्राबाबत माहिती असणे गरजेचे आहे असे वाटते. पण, राजकारणात पाऊल टाकण्याबाबत रितेश सध्या निश्चित काहीच सांगू शकत नाही असे म्हणाला. “मी राजकारणात जाईन किंवा नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण एक नागरिक म्हणून आपल्याला स्वतःच्या राष्ट्राबाबत माहिती असणे गरजेचे आहे. जागरूक असणे हे महत्वाचे आहे आणि स्वतःचे मत असणे हे त्याहूनही महत्वाचे आहे,” असे रितेश म्हणाला.
‘तुझे मेरी कसम’ या २००३साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने रितेशने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.