‘एक व्हिलन’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा मोहित सूरीसोबत काम करण्यास सज्ज झाला आहे. मोहितच्या आगामी चित्रपटात तो प्रसिद्ध विनोदवीर अभिनेता दादा कोंडके यांची भूमिका साकारताना दिसेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट दादा कोंडकेंच्या जीवनावर आधारित असेल. यात त्यांच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यावर प्रकाश टाकला जाईल. दादांवरील आधारित चित्रपटाची निर्मिती अश्निनी यार्दी आणि अक्षय कुमारची निर्मिती संस्था ग्राजिंग गोट पिक्चर्स हे करणार आहेत. सध्या रितेश आगामी चित्रपट बँगिस्तानच्या चित्रिकरणात व्यस्त आहे.
७०च्या दशकात दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. तसेच, सर्वाधिक रौप्यमहोत्सवी चित्रपट देण्यासाठी त्यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही करण्यात आलेली आहे.