बॉलिवूडमधील आदर्श जोडपं म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक वेळा हे जोडपं आपल्यामधील प्रेमळ नातं जपतांना दिसून आले आहेत. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘लय भारी’ या चित्रपटाद्वारे जेनेलियाने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर आता महाराष्ट्राची लाडकी सून पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीकडे वळतांना दिसून येत आहे.

जेनेलिया निर्मित ‘लय भारी’ चित्रपटातून रितेशने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर रितेश पुन्हा एकदा ‘माऊली’ या चित्रपटातून कमबॅक करणार आहे. ‘लय भारी’ चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाची निर्मितीही जेनेलिया करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


वाचा : आणखी एका सेलिब्रिटी किडच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत चंकीने केला ‘हा’ खुलासा

‘माऊली’चे चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून हा चित्रपट आमच्यासाठी खरंच मोलाचा आहे. त्यामुळे ‘माऊली’ आमच्यासाठी महत्वाकांक्षी चित्रपट आहे, असे जेनेलियाने ट्विटर करत सांगितले. या चित्रपटामध्ये रितेश मुख्य भुमिकेत असून चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करत आहेत. तर पटकथेची जबाबदारी क्षितीज पटवर्धन यांनी उचलली आहे.

एक अभिनेता असल्याकारणाने प्रत्येक प्रकारची भूमिका करण्याची माझी इच्छा आहे आणि मराठीतील ‘लय भारी’ चित्रपट केल्यानंतर माझ्यातील आत्मविश्वासात अधिक भर पडली. मला साहसदृश्य आणि मनोरंजनपूर्ण चित्रपटांमध्ये झळकायला आवडेल. विशेष म्हणजे ‘माऊली’ चित्रपटाची पटकथा वाचल्यानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करण्याचा निर्णय मी घेतल्याचे रितेशने सांगितले.