अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्र वर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मंगळवारी अटक केली. जामीन अर्ज फेटाळून न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली.

अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. ‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.

अमली पदार्थाचे सेवन कधीच केले नाही, असा दावा रियाने याआधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये केला होता. मात्र, आपण शोविक, रियाच्या सांगण्यावरून अनेकदा अमली पदार्थ सुशांतच्या घरी आणले होते, असे नोकर दीपेश याने चौकशीदरम्यान सांगितल्याचा दावा ‘एनसीबी’ने न्यायालयासमोर केला.

अटके नंतर रियाची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यात प्रतिजन चाचणीचाही समावेश होता. ‘एनसीबी’ने दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे रियाला दंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले. ‘एनसीबी’ने रियाच्या पोलीस कोठडीसाठी आग्रह न धरल्याने न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवले. सुनावणीदरम्यान रियाने जामीन अर्ज सादर केला. तो न्यायालयाने फे टाळला, अशी माहिती ‘एनसीबी’चे उपसंचालक के पीएस मल्होत्रा यांनी दिली.

सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रिया मुख्य आरोपी आहे. आर्थिक गैरव्यवहाराबाबत सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केलेल्या आरोपप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) तपास सुरू आहे. रिया आणि अन्य आरोपींनी भ्रमणध्वनीतून काढून टाकलेले व्हॉट्सअ‍ॅप संदेश ईडीने प्राप्त केले. त्यातून रिया आणि अन्य आरोपी अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात होते, अशी माहिती पुढे आली. त्यानंतर ‘एनसीबी’ने गुन्हा नोंदवून या प्रकरणी तपास सुरू केला.

‘न्यायप्रक्रि येची थट्टा’

‘अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या आणि मानसिक विकारांनी त्रस्त असलेल्या एका व्यक्तीच्या (सुशांत) प्रेमात पडणे हाच रियाचा गुन्हा आहे. या व्यक्तीने चुकीची औषधे आणि अमली पदार्थामुळे आत्महत्या केली आणि तीन केंद्रीय यंत्रणा रियाचा पिच्छा पुरवत आहेत. ही न्यायप्रक्रि येची थट्टा आहे’, अशी प्रतिक्रि या अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांनी रियाच्या अटके नंतर दिली.