‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का’, असं म्हणत साधारण वर्षभरापूर्वी आरजे मलिष्काने अक्षरश: धुमाकुळ घातलेला होता. पावसाच्या दिवसांमध्ये दरवर्षी रस्त्यावरील खड्डे आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या समस्या डोकं वर काढतात आणि या साऱ्याचा त्रास सहन करावा लागतो तो म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांना. याच पार्श्वभूमीवर ‘मुंबई की रानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरजे मलिष्काने पुन्हा एकदा नव्या गाण्याच्या माध्यमातून मुंबईच्या खड्ड्यांकडे सर्वांचच लक्ष वेधलं आहे.

मलिष्का आणि तिच्या टीमने मोठ्या कलात्मकपणे तयार केलेल्या या गाण्याचा व्हिडिओ तिने ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. मलिष्काने तिच्या रेडिओ शोवरच हे गाण लाँच केलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर ही सैराट मलिष्का पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. ‘कुछ घंटो मे अख्खा मुंबई पाण्याखाली आली’, असं म्हणत ‘झिंगाट’ या गाण्याचीच चाल खड्ड्यांसाठीच्या गाण्याला देण्यात आली आहे. अतिशय सोपे, पण तितकेच प्रभावी आणि रोजच्या वापरातील शब्द या गाण्याला तितकंच रंजक करण्याच कारणीभूत ठरत आहेत.

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

‘गेली आमची मुंबई खड्ड्यात’, असं म्हणत पुन्हा एकदा या मुंबापुरीच्या तुंबापुरी होण्याकडे लक्ष वेधणाऱ्या मलिष्काचं हे गाणं आता महानगरपालिकेपर्यंत पोहोचतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच पालिका प्रशासन आता या गाण्यासाठी मुंबईच्या राणीची पाठ थोपटणार, की तिला ‘खास भेट’ देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, खुद्द मलिष्कासुद्धा तिच्या रेडिओ शोदरम्यान या गाण्याच्या मुद्द्यावरुन आपली भूमिका ठामपणे मांडत असून, गाण्यासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांसाठी तयार असल्याचं कळत आहे.